Pune Crime: निवृत्त पोलीस महानिरीक्षकाच्या मुलाचा पुण्यात खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 06:26 PM2022-06-30T18:26:20+5:302022-06-30T18:26:30+5:30
भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक केली
पुणे : पार्किंगच्या जागेतून गाडी काढण्याच्या वादात निवृत्त पोलीस महानिरीक्षकांच्या मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. नरेंद्र रघुनाथ खैरे (वय ३३, रा. आंबेगाव बुद्रुक) असे खून झालेल्या या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना अटक केली आहे. युवराज जंबू कांबळे (वय २०, रा. पद्मावती वसाहत), ओंकार अशोक रिठे (वय २४, रा. आंबेगाव बुद्रुक), वैभव पोपट अदाटे (वय २४, रा. चरवड वस्ती, वडगाव बुद्रुक), मनोज दत्तात्रय सूर्यवंशी (वय २४, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) आणि हॉटेल मॅनेजर विष्णू कचरू कदम (रा. नर्हे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आठ जणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजून ३८ मिनिटे ते २७ जून सकाळी १० वाजून ५ मिनिटे यादरम्यान आंबेगाव बुद्रुक येथील साई विश्व सोसायटी, न्यू प्यासा बारसमोरील पार्किंगच्या जागेत घडली.
अधिक माहितीनुसार, नरेंद्र खैरे हे एका खासगी कंपनीत नोकरी करीत होते. खैरे यांच्या गाडीच्या पाठीमागे आरोपींनी त्यांची गाडी पार्क केली होती. गाडी बाजूला काढण्याच्या कारणातून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी आरोपींनी खैरेंच्या स्प्लीन (हा एक मुठीच्या आकाराचा अवयव आहे जो तुमच्या पोटाच्या वरच्या डाव्या बाजूला, तुमच्या पोटाच्या पुढे आणि तुमच्या डाव्या फास्यांच्या मागे असतो.) या अत्यंत नाजूक अवयवावर वारंवार हाताने ठोसे मारले. या मारहाणीत खैरेंना अंतर्गत गंभीर दुखापत झाली. चक्कर आल्यामुळे ते खाली कोसळले. त्यानंतर काही वेळाने सावरून पार्किंगमधील गाडी काढून घराकडे निघाले होते. मात्र परत चक्कर आल्याने ते खाली कोसळले. यावेळी तिघा जणांनी त्यांना उचलून श्री साई मोटर्स येथे ठेवून दिले. आरोपींनी खैरे यांच्या खिशातील पाकीट, मोबाईल, हेडफोन इत्यादी वस्तू चोरून नेल्या.
हा सर्व प्रकार हॉटेल मॅनेजर विष्णू कदम याने समक्ष घडलेला पाहिला, मात्र त्यांनी त्याची माहिती कोणालाही दिली नाही. त्यांनी हे पोलिसांना कळविले असते तर जखमीला वेळेवर मदत मिळाली असती. त्यातून त्याचा कदाचित जीव वाचला असता. खुनासारख्या गुन्ह्यात माहिती न देता, हेतुपुरस्सर कुचराई म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. खैरे यांना दुसरीकडे ठेवून देणारे तिघे व्यक्ती कोण आहेत, याचादेखील पोलीस शोध घेत आहेत.
असा लागला छडा
श्री साई मोटर्स येथे एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी मृत व्यक्तीच्या खिशात एक ओळखपत्र मिळून आले. त्याच्यावर नरेंद्र रघुनाथ खैरे असे लिहिलेले होते. शवविच्छेदन अहवालात मारहाण केल्यामुळे अंतर्गत जखमा झाल्याने नरेंद्र खैरे यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी माहिती घेतली तेव्हा ते प्यासा बार येथे आल्याचे समजले. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेऊन पडताळणी केली असता, खैरे यांना चौघे जण मारहाण करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी केलेल्या मारहाणीत खैरे यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.