Pune Crime: ‘शेअर’ने आयुष्यात कहर; २८ लाखांना ओरबाडले!
By नितीश गोवंडे | Published: September 7, 2023 06:09 PM2023-09-07T18:09:02+5:302023-09-07T18:09:25+5:30
हा प्रकार जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२३ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे...
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ४१ वर्षीय व्यक्तीची २८ लाख ४१ हजार ३४८ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लखन महावीर सवाने (३१, रा. येरवडा), प्रियंका लखन सवाने (२८) या दोन जणांविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नाेंदवण्यात आला. याबाबत गणेश गुलाब भालेराव (रा. येरवडा) असे फिर्यादीचे नाव आहे. हा प्रकार जानेवारी २०२१ ते जानेवारी २०२३ दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन सवाने याने भालेराव यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला भालेराव यांच्याकडून ५० हजार घेत, त्याबदल्यात चांगली रक्कम देत त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांच्याकडून ३० लाख ९० हजार रुपये बँक खात्यावर तसेच रोख १२ लाख रुपये घेतले. त्यापैकी १४ लाख ४९ हजार सवाने आरोपींनी परत केले. उर्वरित २८ लाख ४१ हजार रुपये देण्यास टाळाटाळ करत असून, ते अद्यापही परत केले नाहीत. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.