Pune Software Engineer Suicide Case: मित्रांनीच संगणक अभियंत्याची गोळी झाडून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 12:29 PM2021-10-14T12:29:59+5:302021-10-14T12:30:08+5:30
कोंढव्यातील संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय येत होता
पुणे : कोंढव्यातील संगणक अभियंत्याची पत्नी भांडणामुळे गेल्या वर्षभरापासून मुलासह वेगळी राहते. तसेच त्याने आत्महत्या करण्याची दिलेली धमकी व मित्रांनी सांगितलेली हकीकत यामुळे या संगणक अभियंत्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय येत होता. मात्र या मित्रांकडे सखोल चौकशी केल्यावर आता त्याला कलाटणी मिळाली असून कोंढवा पोलिसांनी या अभियंत्याच्या दोघा मित्रांना अटक केली आहे. खूनासाठी वापरण्यात आलेले पिस्तुल पोलिसांनी विहिरीतून शोधून काढले आहे.
सागर दिलीप बिनावत (वय ३३, रा. श्रद्धानगर, कोंढवा) आणि दत्तात्रय देवीदास हजारे (रा. कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गणेश तारळेकर (वय ४७, रा. सन फ्लॉवर सोसायटी, कोंढवा) असे खून झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची पत्नी स्फुर्ती गणेश तारळेकर (वय ४२, रा. पिसोळी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्यापूर्वी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश तारळेकर हे विवाहित असून त्यांना एक १४ वर्षाचा मुलगा आहे. कौटुंबिक भांडणामुळे त्यांची पत्नी मुलासह एक वर्षापासून जवळच असलेल्या आपल्या वडिलांकडे राहत आहेत. गेल्या रविवारी दुपारी गणेश तारळेकर हे आपल्या दोन मित्रांसह घरात पार्टी करीत होते. त्यावेळी गणेश यांनी पिस्तुल काढून आत्महत्या करणार असल्याचे म्हणाले. या दोघा मित्रांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांनी गोळी झाडून घेतली. गोळी त्यांच्या हनुवटीला लागून ते रक्ताच्या थोरोळ्यात पडले. या प्रकाराने दोघे मित्र घाबरुन गेले. ते तारळेकर यांना तसेच घरात टाकून पळून गेले.
सोमवारी दुपारी त्यांनी ही बाब पोलिसांना कळविली. कोंढवा पोलिसांनी घरात जाऊन पाहिले असता तारळेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. या घटनेच्या दोन दिवस अगोदर गणेश तारळेकर यांनी त्यांच्या सासऱ्यांनी फोन करुन आपण आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली होती. तशी तक्रार त्यांनी कोंढवा पोलिसांकडे केली होती.या दोघा मित्रांनी सांगितलेली हकीकत आणि या घटनेच्या दोन दिवस अगोदरची घटना यावरुन त्यांनी खरोखरच आत्महत्या केली असावी असा संशय पोलिसांना येत होता.
पोलिसांच्या तपासात वेगळी माहिती पुढे आली
मात्र, याबाबत केलेल्या तपासात वेगळी माहिती पुढे आली. दारु पार्टी करीत असताना या दोघा मित्रांनी संगनमत करुन कोणत्यातरी कारणावरुन तारळेकर यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडून त्यांचा खून केला व त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पिस्तुल विहिरीत फेकून दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी विहीरीत टाकलेले हे पिस्तुल शोधून काढले असून तारळेकर यांच्या पत्नीच्या फियार्दीवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. जर त्यांनी आत्महत्या केली तर ते दोघेही एकत्र का पळून गेले. या दोघांनी कोणत्या कारणावरुन त्यांचा खून केला. याचा पोलीस निरीक्षक जानकर अधिक तपास करीत आहेत.