Pune Crime Swargate bus depot : आमची भूमिका - आता बस..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 12:12 IST2025-02-27T12:08:32+5:302025-02-27T12:12:48+5:30

स्त्री म्हणजे तिचे फक्त शरीर, असे वाटणाऱ्या या नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे. ते ठेचले गेले नाही, म्हणून ही वेळ आली

Pune Crime Swargate bus depot 26-year-old girl raped in Shivshahi at Swargate bus stand; Accused absconding | Pune Crime Swargate bus depot : आमची भूमिका - आता बस..!

Pune Crime Swargate bus depot : आमची भूमिका - आता बस..!

- संजय आवटे, संपादक 

अशा बातम्या प्रसिद्ध करतानाही आम्हाला लाज वाटते. या बातम्या प्रसिद्धच करू नये, असे कैकदा मनात येते. पण, करणार काय? वास्तव कितीही भयंकर असले, तरी त्यापासून आपल्याला पळ कसा काढता येईल ? हेच वर्तमानाचे वास्तव असेल, तर आम्हाला या वर्तमानाची शरम वाटते. आपल्याला आपलीच शरम वाटावी, अशी ही बातमी आहे. या मोकाट पशूंचा ‘माणूस’ कधी होणार ? स्त्री म्हणजे तिचे फक्त शरीर, असे वाटणाऱ्या या नराधमांना वेळीच ठेचले पाहिजे. ते ठेचले गेले नाही, म्हणून ही वेळ आली आहे.

रयतेच्या राजाचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव भाळी लावलेल्या एका बसमध्ये अशी घटना घडतेच कशी ? पोलिस चौकी हाकेच्या अंतरावर असताना, नराधमाची अशी हिंमत होतेच कशी? स्वारगेट बस स्टॅंड हे देशभरात ठाऊक असलेले स्थानक. नेहमीच गर्दीने गजबजलेले बस स्थानक. इथे एवढी किमान सुरक्षा व्यवस्था असू नये ?, आपल्या सगळ्या यंत्रणा मग करतात तरी काय? या बस स्थानकाच्या परिसरात काय-काय घडते, त्याचे तपशील आता समोर येऊ लागले आहेत. एसटी प्रशासनाला ते समजत नाही ?, पोलिसांना हे दिसत नाही ? एरव्ही दिसेल त्या गाडीला शिट्टी मारणाऱ्या पोलिसांना ही धोक्याची घंटा ऐकू येत नाही ?

मुळात स्त्रीकडे केवळ ‘शरीर’ म्हणून बघणारी नजर असते, तेव्हाच या अशा घाणेरड्या घटना घडतात. लहान बालिकेपासून वृद्धांपर्यंत कोणी त्यापासून सुटलेले नाही. रस्त्यावर स्त्री असुरक्षित आहे, असे मानावे, तर अनेक कार्यालयांमध्ये काय चित्र आहे ? सार्वजनिक ठिकाणे सोडा, घरात काय वेगळी अवस्था आहे? जिथे गर्भाशयातच ‘ती’ असुरक्षित असते, तिथे इतर ठिकाणांचे काय?

तिला असुरक्षित जे करतात, त्यांना जेरबंद करण्याऐवजी आपण करतो काय? आपण तिलाच बंद करून टाकतो. तिलाच डांबून टाकतो. सातच्या आत घरात यायला तिला भाग पाडतो आणि तिला असुरक्षित करणारे मात्र रात्रभर मोकाट. ही मानसिकता बदलायला हवी. स्त्रीला असुरक्षित करणारी ही नजर ठेचायला हवी.

या मुलीचे कौतुक करायला हवे. कारण, तिने लगेच पोलिसांकडे जाऊन तक्रार नोंदवली. ज्याने अत्याचार केला, त्याला बेइज्जत करण्याऐवजी अनेकदा जिच्यावर बलात्कार झाला, तिच्याच चारित्र्याविषयी बोलले जावे, यासारखी निर्लज्ज गोष्ट नाही. अनेक मुली-महिला अत्याचार होऊनही गप्प बसतात आणि अशा नालायकांचे फावते. मुलींनी हिंमत दाखवली पाहिजे. हे असले नराधम ओळखले पाहिजेत. काही घडत असेल, तर त्वरेने बोलले पाहिजे. मौन सोडले पाहिजे. असे नराधम गजाआड जाण्यासाठी समाजानेही या मुलींना साथ दिली पाहिजे.

पुण्याला सावित्रीमाईंचा वारसा आहे आणि डॉ. आनंदीबाईंचाही. जिथे राजमाता जिजाऊंनी शिवरायांसारखा रयतेचा राजा घडवला आणि ज्ञानदेव-तुकारामांनी इथेच समतेचा संदेश दिला. इथेच तर स्वातंत्र्यासाठी कस्तुरबांनी आपला जीव दिला. याच पुण्यात धोंडो केशव कर्व्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचले आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी हुजुरपागेचे बीज रोवले. इथेच तर पंडिता रमाबाईंनी व्यवस्थेला खडे बोल सुनावले. त्या पुण्यात हे घडावे ? आज नाही. वारंवार हे घडत आहे. प्रत्येकवेळी आक्रोश होतो. पण, व्यवस्था बदलत नाही. पाण्यावर तरंग नाही.

एवढे कोटी आले आणि मेट्रो आली, म्हणून शहराचा विकास होत नसतो. ज्या शहरात पहाटे-पहाटे अशी काळरात्र येते, त्या शहराचे काही होऊ शकत नाही. आता आयुष्याच्या मशाली पेटवल्या नाहीत, तर उद्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फक्त काळरात्र असणार आहे !

Web Title: Pune Crime Swargate bus depot 26-year-old girl raped in Shivshahi at Swargate bus stand; Accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.