स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2025 12:57 IST2025-03-02T12:55:51+5:302025-03-02T12:57:00+5:30
- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट एसटी स्थानकाच्या सुरक्षेचा घेतला आढावा

स्वारगेटच्या सुरक्षेत मोठा बदल..! एसटी महामंडळात IPS अधिकाऱ्यांची नेमणूक
पुणे -स्वारगेट एसटी स्थानकात घडलेल्या महिला सुरक्षेशी संबंधित घटनेच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी एसटी महामंडळात IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याची घोषणा केली.शनिवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येणार असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तक्रार निवारण कक्ष आणि टोल-फ्री क्रमांक सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
एसटी स्थानकांमध्ये खासगी बसची घुसखोरी रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जातील, तसेच 15 एप्रिलपूर्वी जुन्या बसेस स्क्रॅप करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हा निर्णय एसटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.
दरम्यान, स्वारगेट बसस्टँड परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून बेड्या ठोकण्यात आल्या. दत्तात्रय गाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर गाडेला शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला.
न्यायालयाने आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दोघांच्या सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला आहे. आरोपीचे वकील म्हणाले, या घटनेनंतर बसमधून दोघे व्यवस्थित बाहेर आले. नंतर आरोपी निघून गेला तर मुलगी दुसऱ्या बसच्या दिशेने गेली. हे सिसिटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. तर सखोल चौकशीसाठी कोठडी मागितल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले आहे