Pune Crime| जेजुरीत इलेक्ट्रिक मोटारी चोरणारे दोघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 06:35 PM2022-09-03T18:35:11+5:302022-09-03T18:36:19+5:30
जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल...
जेजुरी (पुणे):जेजुरी पोलीस ठाण्यांतर्गत इलेक्ट्रिक मोटारी चोरणारे गजाआड करण्यात आले आहेत. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रमोद गोरख जगताप (वय ३० वर्षे) व्यवसाय मोटार दुरुस्ती (रा. जवळार्जुन ता. पुरंदर) हे त्याचे मालकीचे दुकान बंद करून घरी गेले. दुकानाचे शटर उचकटून दुकानातील दहा इलेक्ट्रिक मोटारी कॉपर वायर व रोख रक्कम असा एकूण ७३ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार देण्यात आली होती. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान संशयित आरोपी सचिन उर्फ पप्पू सर्पत रोमन (वय ३५ वर्षे) (रा. रोमनवाडी, ता. पुरंदर) तसेच पंजू रामदास धनगर ऊर्फ पवार (वय ४२ वर्षे) (रा. सावरगाव पो. मादाळमोई ता. गेवराई जि. बीड, हल्ली रा. कुदळेमळा, यवत ता. दौड, जि. पुणे) या दोघांवर यापूर्वी मागील काही वर्षांत अशाच प्रकारचे सहा-सात गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.
त्या दृष्टीने तपास सुरू करताना याच आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. चोरीस गेलेल्या एकूण १० इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी त्यांनी केडगाव चौफुला येथून चोरल्याचे कबूल केले आहे. त्याबाबत यवत पो.स्टे येथे गुन्हा नोंद आहे. आरोपींनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यादृष्टीने त्याच्याकडे तपास सुरू आहे. आरोपींनी आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून त्याच्याकडे त्यादृष्टीने तपास सुरू आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर पोलीस हवालदार बनसोडे हे करीत आहे.