पुणे: ‘ड्राय डे’साठी उसळली गर्दी ,अनेक रस्त्यांवर वाहतूककोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 01:44 AM2017-09-05T01:44:50+5:302017-09-05T01:45:02+5:30
‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’असलेला ‘खंबा’ खरेदी करण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दुकानांच्या परिसरात सोमवारी रात्री १० नंतर चक्क वाहतूककोंडी झाली.
पुणे : ‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’असलेला ‘खंबा’ खरेदी करण्यासाठी उसळलेल्या गर्दीमुळे ५०० मीटर अंतराच्या आत असलेल्या दुकानांच्या परिसरात सोमवारी रात्री १० नंतर चक्क वाहतूककोंडी झाली. ५०० मीटर अंतर मर्यादेमुळे शहरात असलेल्या मोजक्या दुकानांपैकी काही दुकानांबाहेर येऊन पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. त्यामुळे लांबच लांब रांगा दुकानांच्या परिसरात लागल्या.
नृत्य करण्यापूर्वी ‘जादुई रंगीत द्रवपदार्थ’ आवश्यक असतो. या द्रवपदार्थाला ‘औषध’ असेही उपनाव आहे. त्याची विक्रय करणारी दुकाने नंतर चतुर्दशीनिमित्त बंद राहणार आहेत. मंगळवारी ‘ड्राय डे’ आहे. त्यामुळे रात्री नऊनंतर ‘खंबा’ खरेदीसाठी वेगवेगळ्या वाहनांमधून ‘रसिक’ शहराच्या मध्यवस्तीमधील दुकानांकडे येऊ लागले. दुकाने बंद होण्याची वेळ रात्री ११ असते. ती वेळ जवळ येऊ लागताच त्या त्या भागात वर्दळ वाढली. काही ठिकाणी रांगेत थांबण्याची सक्ती केली जात असल्याने रांग वाढतच गेली.
पश्चिम पुण्याकडील एका रस्त्यावरच्या दुकानात रात्री १०च्या सुमारास गर्दी एव्हढी वाढली आणि गोंधळ होऊ लागला की, दुकानदाराने वैतागून शटर बंद केले. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ झाला. त्यामुळे गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. पोलिसांचे अस्तित्व दिसताच गोंधळ कमी होऊन मंडळी रांगेत थांबली.
बॉक्स हातात येताच आनंदून वेगाने आपापल्या ठिकाणी रवाना होणाºया मंडळींमुळे पुणेकरांना विस्मय वाटला. ‘उद्याची तयारी वाटतं’असं स्वगत पुटपुटून ते वाहतूककोंडीतून मार्गस्थ झाले.