धक्कादायक ! प्रायव्हसी मिळत नसल्याने सुनेने रचला सासूच्या हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 10:40 AM2018-08-02T10:40:17+5:302018-08-02T10:44:25+5:30

सासूचा काटा काढण्याचा कट रचणाऱ्या सूनेचं बिंग अखेर फुटलंय.

Pune : daughter-in-law planned murder of mother in law | धक्कादायक ! प्रायव्हसी मिळत नसल्याने सुनेने रचला सासूच्या हत्येचा कट

धक्कादायक ! प्रायव्हसी मिळत नसल्याने सुनेने रचला सासूच्या हत्येचा कट

पुणे : सासूचा काटा काढण्याचा कट रचणाऱ्या सूनेचं बिंग अखेर फुटलंय. रस्त्यावर अपघात झाल्याचे सांगून सून,तिची बहीण आणि मित्रानं सासूला ससून रुग्णालयात दाखल केले. बेशुद्ध असलेल्या महिलेची स्थिती आणि अपघाताबाबत तिच्या नातेवाईकांनी सांगितलेली हकीकत ऐकून पोलिसांना संशय आला. त्यांनी सखोल चौकशी केल्यानंतर आणि पोलिसी खाक्या दाखवताच सुनेनेच बहीण व तिच्या मित्राच्या मदतीने सासूला झोपेच्या गोळ्या देऊन ककूरने मारहाण करत गळा आवळला व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे  धक्कादायक वास्तव घडकीस आले. केवळ निवांतपणात अडथळा नको, म्हणून सूनेनं सासूच्या हत्येचा कट रचला. कोंढवा पोलिसांनी 22 वर्षांची सून व तिचा मित्र आसिफ हुसेन शेख (वय 20 वर्ष, कासेवाडी) या दोघांना अटक केली आहे. 

फरजाना शेख (वय 45 वर्ष) असे सासूचे नाव असून त्यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलाचा फेब्रुवारीमध्ये निकाह झाला. त्यांचा मुलगा कामाला गेला की सून-सासू एकट्याच घरात असतात. दुपारी आपल्याला सासूमुळे निवांतपणा मिळत नाही. घरातील कामावरुन  नेहमीच दोघींमध्ये वाद होत असत. या सगळ्याला कंटाळून तिनं बहीण-मित्राच्या मदतीनं सासूचा काटा काढण्याचा कट रचला.

त्यानुसार सोमवारी 30 जुलैला दुपारी सुनेने सासूला गुंगीचे औषध असलेले सुप पिण्यासाठी दिले. सासू बेशुद्ध होताच तिने मित्राला बोलावून घेतले. मित्राला सासूची हत्या करण्याचा कट तिनं सांगितला. पण त्यानं आपण असं काहीही करणार नसल्याचं सांगून तो घरातून बाहेर पडला. मग तिनं छोट्या बहिणीला बोलावून घेतले ती व तिचा मित्र दोघे आले. त्या तिघांनी सासूला कूकरने बेदम मारहाण केली. पट्टयानं सासूचा गळा आवळायचा प्रयत्न केला. निपचित पडलेले पाहून सासूचा मृत्यू झाल्याचं या तिघांनाही वाटलं. म्हणून तिला थेट ससून रुग्णालयात दाखल केले, यावेळ डॉक्टरांनी तपासल्यावर  महिला जिवंत असल्याचे लक्षात आले. डॉक्टरांनी चौकशी केल्यानंतर महिला अपघातात जखमी झाल्याची खोटी माहिती या तिघांनी दिली. मात्र संशय आल्यानं डॉक्टरांना कोंढवा पोलिसांना संपर्क साधला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांनी रात्री ससून रुग्णालयात जाऊन या महिलेला पाहिले तर ती बेशुद्ध होती. तिच्या सूनेने त्यांचा रस्त्यात अपघात झाल्याचे सांगून तीन महिलांनी त्यांना घरी आणल्याचे सांगितले. बेशुद्ध असलेल्या महिलेला चौथ्या मजल्यावर कसे आणले असा प्रश्न गायकवाड यांच्या मनात आला. त्यांनी सखोल चौकशी करायला सुरुवात केल्यावर सून लटपटली व तिने आपण मारल्याचे कबुल केले. अगोदर तिने आपण मारल्याचे सांगितले, मग आपल्या मित्राने मारल्याचे सांगितले़ नंतर तिने बहिण व तिच्या मित्राच्या मदतीने मारल्याचे कबूल केले. ज्या छोट्या कुकरने मारहाण केली. त्यावर पोलिसांना रक्ताचे डाग आढळून आले असून पोलिसांनी तो जप्त केला आहे.

Web Title: Pune : daughter-in-law planned murder of mother in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.