पुणे-दौंड लोकल मार्गाची तपासणी सुरू
By admin | Published: September 30, 2016 04:45 AM2016-09-30T04:45:08+5:302016-09-30T04:45:08+5:30
दौंड-पुणे लोकल मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी गुरुवारी सकाळपासून दौंड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत दौंड
पुणे : दौंड-पुणे लोकल मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाची तपासणी गुरुवारी सकाळपासून दौंड रेल्वे स्थानकावरून सुरू करण्यात आली. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन पर्यंत दौंड स्थानकातील कामाची तपासनी केल्यानंतर, तीन वाजून ४० मिनिटांनी हे पथक विशेष गाडीसह पुण्याकडे रवाना झाले. त्यानंतर पाटस- कडेठाण स्थानकांची तपासणी करून, सायंकाळी साडेसहाच्या सुमारास केडगाव स्थानकात ही तपासणी थांबविण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. रेल्वेसुरक्षा आयुक्त सुशील चंद्रा यांच्या उपस्थितीत ही तपासणी सुरू आहे.
गेली अनेक वर्षे या मार्गावरील लोकलसाठी विद्युतीकरणाचे काम सुरू होते. हे काम मागील आठवड्यात पूर्ण करण्यात आले असून, या मार्गावर तीन दिवसांपूर्वीच रेल्वे प्रशासनकडून इलेक्ट्रिक लोको (विद्युत प्रवाहावर चालणारे इंजिन) सोडण्यात आले होते. त्याची चाचणी यशस्वी झाली. त्यानंतर या कामाच्या तपासणीसाठी रेल्वे विभागास भूपृष्ठ मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने आयुक्त चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी सकाळपासून दौंड स्थानकातील कामाची तपासणी केली. या वेळी पुणे विभागाचे व्यवस्थापक बी. के. दादाभॉय यांच्यासह गौरव झा, कृष्णाथ पाटील यांच्यासह अभियंत्यांचे पथकही उपस्थित होते. दरम्यान, ही विशेष गाडी केडगावपर्यंत पोहचल्यानंतर रात्री अंधार झाल्याने पथकाकडून तपासणी थांबविण्यात आली असून शुक्रवारी (दि. २९) रोजी सकाळी नऊच्या सुमारास हे पथक पुण्यातून केडगावकडे रवाना होणार आहे.
पुणे-जयपूर एक्स्प्रेसला तीन जादा डबे
सुट्यांच्या कालावधीत राजस्थानमध्ये जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून गाडी क्रमांक १२९४० जयपूर-पुणे-जयपूर एक्स्प्रेस या गाडीला प्रथमदर्जा श्रेणीचे तीन जादा वातानुकूलित डबे जोडण्यात येणार आहेत.
जयपूरहून पुण्याकडे येताना १ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीसाठी, तर पुण्याहून जयपूरकडे जाताना २ आॅक्टोबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीसाठी ही सुविधा उपलब्ध
करून दिली जाणार असून, जास्तीत जास्त प्रवाशांनी
त्याचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून
करण्यात आले आहे.
या मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्त तपासणी करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारनंतर केडगाव रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. या मार्गावर लोकलचा रेक धावणार असल्याची धारणा झाल्याने ही गाडी पाहण्यासाठी हे नागरिक जमलेले होते.
सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आलेली ही तपासणी गाडी
अवघे दोन मिनीटच स्थानकावर थांबली. या वेळी रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांच्यासह इतर प्रवासी संघटनाचे प्रतिनिधीही केडगाव स्थानकावर उपस्थित होते. तसेच त्यातील कोणताही अधिकारी नागरिकांशी बोलला नाही.
अधिकारी गाडीतून उतरताच ही गाडी पुण्याकडे रवाना झाली. त्यामुळे स्वागतासाठी जमलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला. या वेळी प्रवासी संघटनांनी लोकल बाबत असलेली निवेदनेही आणली होती. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याने ती स्वीकारली नसल्याचे हर्षा शहा यांनी सांगितले.