पुण्याचा साथीच्या आजारांशी सामना पेशवाईपासून; प्लेगच्या आधी व्हायचा देवी रोगाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 12:58 PM2020-03-18T12:58:23+5:302020-03-18T12:59:31+5:30

पेशव्यांनी टोचून घेतली होती लस

Pune is dealing with ailments from peshwai | पुण्याचा साथीच्या आजारांशी सामना पेशवाईपासून; प्लेगच्या आधी व्हायचा देवी रोगाचा घाला

पुण्याचा साथीच्या आजारांशी सामना पेशवाईपासून; प्लेगच्या आधी व्हायचा देवी रोगाचा घाला

Next
ठळक मुद्देप्लेग , देवी, स्वाईन फ्ल्यू ते कोरोना

राजू इनामदार- 
पुणे : पुण्यात साथीच्या आजारांची सुरुवात पेशवाईच्या आधीपासूनची आहे. पेशवाईत देवीच्या आजाराची साथ यायची. इंग्लंडमध्ये या आजारावर निघालेल्या लशीचा वापर प्रभावी ठरल्याने त्या वेळच्या पुण्यातील इंग्रज रेसिडंटने ही लस तिथून मागवली व ती पेशव्यांच्या कुटुंबीयांनीही टोचून घेतली होती. तत्पूर्वी ही लस पुण्यात आणणारा डॉ. कोट्स याचे शनिवारवाड्यासमोर लस कशी उपयुक्त आहे, यावर व्याख्यान झाले होते.
पुणे म्हटले, की बहुतेकांना प्लेगची साथच आठवते. त्याच्याशी रँड या इंग्रज अधिकाऱ्याचे जुलूम व त्यानंतर चापेकर बंधूंनी केलेला त्याचा खून या गोष्टी जोडल्या गेल्यामुळे ते स्वाभाविकच आहे. तसेच, सन १८९६ पासून ते सन १९११ पर्यंत दर वर्षी पुण्यात प्लेग येतच होता व त्यात शब्दश: हजारो नागरिक मृत्युमुखी पडत होते. मात्र, त्याच्याही आधीपासून पुणेकर नागरिक साथीच्या आजारांचा सामना करीत आहेत. त्यात तत्कालीन राज्यकर्त्यांचा व त्यानंतर १८५६मध्ये स्थापन झालेल्या नगरपालिकेचा फार मोठा वाटा आहे.
नगरपालिका स्थापन होण्याच्या आधी किमान ६० वर्षे आधी म्हणजे सन १७९८मध्ये पुण्यात पेशवाईचा अंतिम श्वास सुरू होता. त्याच्याही आधीपासून पुण्यात देवीच्या रोगाची साथ यायची. जगभरात त्या वेळी या आजाराने असेच थैमान घातले होते. १७९८मध्येही अशीच साथ आली. त्याआधी सन १७९६मध्ये इंग्लंडमध्ये काही डॉक्टरांनी गाईच्या कासेवरील फोडांपासून या आजारावर लस तयार केली होती व त्याचा उपयोग झाला होता. युरोपात त्या वेळी या लशीचा बराच बोलबाला होऊन वापरही सुरू झाला होता.
याची माहिती असलेला डॉ. कोट्स हा अधिकारी त्या वेळी पुण्यात आला होता. त्याने पुण्यात देवीचा आजार झालेला पाहिला. महिला व मुलांना होत असलेला त्रास त्याला पाहवेना. त्यामुळे त्याने इंग्लंडहून ही लास मागवली. पेशव्यांचे सहकार्य मागितले. त्यांनी त्याला शनिवारवाड्यासमोर या लशीच्या उपयोगाविषयी व्याख्यान द्यायला लावले. त्याने ते दिलेही. ऐकायला गर्दी झाली; पण लोकांचा विश्वास बसेना. त्यामुळे त्याने शेवटी ही लस त्यांच्यासमोर स्वत:ला टोचून घेतली. 
..........
डॉ. कोटकांच्या प्रयत्नामुळे पुणेकरांची खात्री 
डॉ. कोट्स याने स्वत:वर केलेल्या या प्रयोगामुळे मात्र पुणेकरांची खात्री पटली व त्यांनी लस टोचून घ्यायला संमती दिली. त्यानंतर त्यानेच नाही तर पेशव्यांच्या कुटुंबीयांनीही ही लस टोचून घेतली. त्यांनाही त्याचा उपयोग झाला. 
४याची माहिती काही पुणेकरांना समजल्यानंतर त्यांनी ‘देवीच्या दोन फुल्या कमी पडतात; चार फुल्या मारा,’ असा आग्रह धरणे सुरू केले. त्यानंतरही देवीच्या आजाराने पुण्याचा पिच्छा सोडला नाही. सन १८५६मध्ये नगरपालिका स्थापन झाली, त्यानंतर पुढची शंभर वर्षे म्हणजे सन १९५६पर्यंत कमीअधिक फरकाने ही साथ येतच होती.
४ नगरपालिकेने व नंतर सन १९५०मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेने परिश्रमपूर्वक या आजारावर मात केली व पुणे देवी आजारमुक्त झाले.   

Web Title: Pune is dealing with ailments from peshwai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.