पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:39 AM2018-10-02T01:39:31+5:302018-10-02T01:40:13+5:30

आपत्ती व्यवस्थापन हे शास्त्र आहे याची गंधवार्ताही महापालिकेला दिसत नाही. त्यामुळेच कालवा फुटल्यावर त्यांची भंबेरी उडाली. ४० लाख लोकसंख्येच्या शहरासाठी हे मुळीच भूषणावह नाही.

Pune Diary - Disaster Management! | पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

पुणे डायरी - व्यवस्थापनाचीच आपत्ती !

googlenewsNext

- राजू इनामदार

कधीकधी एखाद्या गोष्टीची अचानक परीक्षा होत असते. खडकवासला धरणाच्या कालव्याची भिंत २७ सप्टेंबरला अचानक खचली. पाण्याचे लोटच्या लोट वस्तीत घुसले, त्यामुळे घरे कोसळली. गॅस सिलिंडर, फ्रिज यासारख्या जड वस्तू वाहून नेल्या. कपडे व अन्य साहित्य पाण्यावर तरंगू लागले. त्याच वेळी महापालिकेची परीक्षा सुरू झाली. ती प्रशासनाची होती तशीच पदाधिकाऱ्यांचीही होती. या परीक्षेत ना प्रशासन उत्तीर्ण झाले, ना पदाधिकारी! महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष नावाचा एक स्वतंत्र कक्ष आहे. तो कक्षही या परीक्षेस उतरला नाही. एक भलेमोठे पुस्तक दरवर्षी प्रकाशित करण्याशिवाय या कक्षाकडून काहीही होत नाही, या आरोपाला पुष्टी मिळावी अशाच गोष्टी त्यानंतर घडत गेल्या.

कालव्याचे पाणी फुटून रस्त्यावर वाहत होते त्यावेळचे एक छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. त्यात एक महिला पोलीस एका लहान मुलाला पाठीवर घेऊन वाहत्या पाण्यातून वाट काढत चालताना दिसते आहे. त्या महिला पोलिसाच्या धाडसाला खरोखरच सलाम. माणुसकी म्हणून हे चांगलेच आहे, मात्र ते चुकीचे आहे. आपत्ती व्यवस्थापन कसे नसावे याचे नेमके उदाहरण म्हणजे हे छायाचित्र आहे. आपत्ती व्यवस्थापनात प्रत्येक यंत्रणेला एक काम आहे. त्यांनी त्या वेळेस तेच करणे अपेक्षित आहे.
पोलिसांनी बघ्यांची गर्दी नियंत्रित करावी, वाहतूक शाखेने वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांनी विजेमुळे शॉर्टसर्किट होऊन दुर्घटना वाढणार नाही हे पाहावे, अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यु आॅपरेशन म्हणजे आपत्तीत अडकलेल्यांची सुटका करावी, आपत्तीग्रस्तांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था एकाने करावी, दुसºयाने त्यांच्या निवाºयाचे पाहावे, आपत्तीमुळे कसली रोगराई पसरणार नाही, आपत्तीत जखमी झालेल्यांना स्ट्रेचरवरून नेणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यासाठी रुग्णवाहिका तयार ठेवणे, हे आरोग्य विभागाने करणे, कपडालत्ता, जेवणाचे साहित्य उपलब्ध करून देणे अशी प्रत्येक यंत्रणेची कामे आहेत. आपत्ती काळात त्यांनी ती करावीत असे अपेक्षित आहे.

सिंहगड रस्त्यावर त्यादिवशी जे घडले ते नेमके याच्या उलट घडले. बघ्यांच्या गर्दीला कोणी आवरत नव्हते. वाहने वाटेल तशी, वाटेल तिथे थांबत होती, त्यांना कोण अटकाव करत नव्हते. पोलीस थेट मदत करायला धावत होते. पाणी कसे थांबवावे याच्या विचारात अग्निशामक दलाचे जवान होते. ढासळलेल्या भिंतींचा राडारोडा उचलायला कोणी उपस्थित नव्हते, संसार उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातील सदस्य स्वत:च आपापल्या घरांमधील काही ऐवज शिल्लक राहिला आहे किंवा नाही ते चिखल उपसून पाहात होते. रस्त्यांवर तीन-चार फुटांपर्यंत पाणी साचून वाहत होते. ते ओसरले त्या वेळी रस्त्याच्या उताराच्या बाजूस सगळा चिखल जमा झाला होता, तो थेट रस्त्याच्या मध्यापर्यंत आला होता. त्यातून अपघात होत होते. त्याकडे कोणी लक्षही देत नव्हते. काही जण तर वाहन रस्त्यावरच लावून घटनास्थळी धावत होते. सगळ्यात चिंताजनक प्रकार म्हणजे घटनास्थळी कोणीही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. महापालिकेत सर्वसाधारण सभा सुरू होती. ती स्थगित करून घटनास्थळी जावे असे कोणालाही वाटले नाही. काही जणांनी भेटी दिल्या, मात्र त्यामुळे गर्दी वाढण्याशिवाय दुसरे काही झाले नाही. सगळ्या यंत्रणांचे कर्मचारी त्यांना समजत होते त्याप्रमाणे काम करत होते. त्या सगळ्यांना एक दिशा देण्याची, कामाचे नियोजन करण्याची, त्याला गती देण्याची, पाणी ओसरल्यानंतर कराव्या लागणाºया कामाचे भान ठेवण्याची आत्यंतिक गरज तिथे त्या वेळी होती. नेमका त्याचाच अभाव होता. त्यामुळेच पोलीस मदतीसाठी धावत होते तर अग्निशामक दलाचे जवान दिङमूढ होऊन उपस्थित होते. आपत्ती व्यवस्थापन असेच राहिले तर या शहराचे काही खरे नाही हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही.

 

Web Title: Pune Diary - Disaster Management!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.