Corona Vaccination: पुण्यालाच कोव्हिशिल्ड मिळेना! कोव्हॅक्सिन लस मिळाल्याने महापालिकेसमोर मोठा पेच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 01:20 PM2021-03-15T13:20:23+5:302021-03-15T13:58:54+5:30
Corona Vaccination in Pune: अनेक ठिकाणी लसीकरण रद्द. नागरिकांना परत पाठवण्याची वेळ. तर १,३४,००० नागरिकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण कसे करायचे महापालिकेसमोर पेच.
पुणे महापालिकेमध्ये कोरोना लसीकरणावरुन (Corona Vaccination) पुन्हा गोंधळ निर्माण झाला आहे. महापालिकेकडचा कोव्हिशिल्डचा (Covishield) साठा संपल्याने दुसऱ्या टप्प्याचे लसीकरण थांबले आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना अनेक केंद्रांवरून माघारी पाठविण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. (Covishield vaccine Shorteg in Pune. 2nd dose Vaccination stopped.)
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोव्हिशिल्डची लस दुसऱ्या डोससाठी राखीव ठेवल्याचे सांगत पहिला डोस घेतलेल्यांना कोरोनाचे लसीकरण सुरु करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले. ज्या कंपनीच्या लसीचा पहिला डोस घेतला त्यांना दुसरा डोसही त्याच लसीचा द्यावा लागणार आहे. मात्र, पालिकेला सीरमच्या कोव्हिशिल्डचा पुरवठाच झालेला नाही, यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे महापालिकेकडे सुरुवातीला कोव्हीडशिल्डचा साठा देण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात लसीकरण करायला आलेल्या नागरिकांना ही लस देण्यात आली होती. मात्र, हा साठा संपल्यानंतर आता महापालिकेला पन्नास हजार कोव्हॅक्सिन लसी पुरवण्यात आल्या आहेत. यामुळे पालिकेसमोर आधी पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस कसा द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुग्णालयांना नव्याने कोव्हॅक्सीनसाठी वेबसाईटवरची नोंदणी प्रक्रिया करायची असल्याने आज याचा परिणाम दिसून आला आहे. अनेक ठिकाणी गोंधळ झालेला पहायला मिळाला. अनेक रुग्णालयांनी लसीकरण थांबवले. तर काही रुग्णालयांत १०० नागरिकांनाच थांबायला सांगत इतरांना माघारी पाठवून देण्यात आले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण ठप्प
एकीकडे हा पहिल्या डोसचा गोंधळ सुरु असतानाच कोव्हिशिल्डचे कमी डोस शिल्लक असल्याने दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण देखील ठप्प झाले आहे. जवळपास १ लाख ३४ हजार लोकांचे दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण थांबलेले असताना लस संपल्याने लसीकरण पुर्ण होण्यासाठी वाट पाहण्याची वेळ या लोकांवर आली आहे.
दरम्यान याविषयी लोकमतशी बोलताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. आशिष भारती म्हणाले “ कोव्हिशिल्डचा शिल्लक साठा हा पुर्णपणे दुसऱ्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी वापरावा. तर नवीन लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन द्यावे, असे आदेश रुग्णालयांना दिले आहेत. तसेच कुठेही लसीकरण थांबु नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. नवीन अभ्यासानुसार दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण हे ६ ते ८ आठवड्यांनी केल्यास काहीच अडचण येत नाही.”