Pune: डिंभे धरणात अवघा चार टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणलोट क्षेत्रात पाणीबाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 12:51 PM2024-05-31T12:51:12+5:302024-05-31T12:57:32+5:30
शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे....
डिंभे (पुणे) : येथील धरणातील पाणीसाठा १,५०४ दशलक्ष घनफुटावर आला आहे. आज या धरणात अवघा ४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सिंचनासाठी डाव्या कालव्याद्वारे ६०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पाणलोट क्षेत्रातील घोडनदीपात्र रिकामे झाली असून, पाणीपुरवठा योजना धोक्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी गाळपेरीवर घेतलेली पिके अडचणीत सापडली असून, धरणाच्या आतील बाजूस पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या डिंभे धरणातील पाणीसाठ्यात यंदा झपाट्याने घट झाली आहे. आजमितीस या धरणात केवळ ४% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. मागील या तारखेला धरणात १४ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक होता. सध्या धरणातून डाव्या कालव्याद्वारे सिंचनासाठी ६०० क्यूसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे धरणाची पाणीपातळी कमी होत असून धरणाच्या आतील बाजूस आसणारे घोडनदीपात्र झपाट्याने रिकामी होत आहे. यामुळे डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या आदिवासी भागातील पाणीपुरवठा योजना धोक्यात आल्या आहेत. डिंभे धरणाच्या पाण्यावर अवलंबून धरणाच्या आतील भागातील शेतकऱ्यांनी गाळपेरीतील उन्हाळी बाजरी, फरशी, मका, जनावरांसाठी हिरवा चारा ही पिके घेतली आहेत. मात्र, धरणातील पाणीसाठा झपाट्याने खाली जात असल्यामुळे ही पिके धोक्यात आली असून, शेतकरीवर्ग अडचणी सापडला आहे.
दूषित पाणी पिण्याची वेळ आली -
नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली असून, यामुळे या भागात आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ लागल्या आहेत. एकंदरीतच डिंभे धरणातील पाणीसाठ्याने यंदा तळ गाठला असून, आजमितीस या धरणात केवळ ४ टक्के इतका निश्चयांकित पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. घोडनदी पात्र कोरडे पडल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.