डॉक्टरी पेशाला लांच्छन; दाभोलकर तपासावेळी प्लँचेट आता मांत्रिक... गुन्हा दाखल करण्याची अंनिसची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 04:06 PM2018-03-13T16:06:27+5:302018-03-13T16:06:27+5:30
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपासाच्या वेळी प्लॅंचेट करण्यात आले होते आणि आता खुद्द डॉक्टरांनी मांत्रिक आणला
पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महिलेवर उपचार करण्यासाठी चक्क डॉक्टरकडूनच मंत्रतंत्राचा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत एका 24 वर्षीय विवाहितेला प्राण गमवावे लागले आहेत. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या घटनेनंतर संताप व्यक्त करताना गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
डॉक्टरी पेशाला अत्यंत लांच्छनास्पद असा हा प्रकार आहे. पुण्यात होणारे प्रकारे धक्कादायक आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपासाच्या वेळी प्लॅंचेट करण्यात आले होते आणि आता खुद्द डॉक्टरांनी मांत्रिक आणला होता. हे गंभीर आहे. आम्ही या संदर्भात तक्रार दाखल करणारंच आहोत. पण जादूटोणा विरोधात पोलिसही तक्रार दाखल करू शकतात, त्यामुळे त्यांनी आम्ही तक्रार दाखल करण्याची वाट बघू नये अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदीनी जाधव यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वी संध्या सोनवणे (वय 24, राहणार दत्तवाडी, पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोनवणे यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी स्वारगेट येथील डॉ सतीश चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र तेथील उपचारांना यश न आल्यामुळे त्यांना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर डॉ. चव्हाण दीनानाथ हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासायला येत असत. नंतर त्यांनी एक दिवस मांत्रिकाला बोलावलं आणि त्याच्यामार्फतही उतारा वगैरे करण्याचा प्रयत्न केला.याबाबत रुग्णाच्या भावाने माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी कोणतीही परवानगी न घेता मंत्रिकाला बोलवल्याचे सांगितले. चव्हाण यांनी चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केली असून त्यातच जीव गमवावा लागल्याचेही नमूद केले.
दरम्यान, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने मात्र असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे सांगत आरोप फेटाळले आहेत.