चिंताजनक! पुणे जिल्ह्यात धडक मोहिमेत २५३ बालके कुपोषित तर १ हजार ६०३ मध्यम कुपोषित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2021 12:46 PM2021-12-11T12:46:26+5:302021-12-11T12:51:18+5:30
जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने कुपोषित बालकांची धडक शोधमोहीम राबवली
पुणे :जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागातर्फे जिल्ह्यात कुपोषित बाधित मुलांचा शोध घेण्यासाठी सर्वेक्षण मोहीम सुरू असून, या मोहिमेत तब्बल २५३ कुपोषित, तर १ हजार ६०३ बालके मध्यम कुपोषित आढळली आहे. या बालकांना पुन्हा सर्वसाधारण गटात आणण्यासाठी अंगणवाडी सेविकांमार्फत त्यांना घरपोच पोषण आहार दिला जात आहे. लवकरच ही बालके सर्वसाधारण गटात येतील, अशी आशा महिला बालकल्याण अधिकारी गिरासे यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून जिल्हा पूर्णपणे कुपोषणमुक्त करण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभागाने कुपोषित बालकांची धडक शोधमोहीम राबवली. या मोहिमेत २५३ बालके ही कुपोषित आढळली, तर १ हजार ६०३ बालके ही मध्यम कुपोषित आढळली. या काळात गरोदर मातांना आणि बालकांना दिला जाणारा पोषक आहार मिळाला नाही. त्यामुळे आदिवासी भागात कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे ऑगस्टमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जिल्ह्यात धडक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात ही माहिती पुढे आली.
या कुपोषित मुलांवर आरोग्य आणि महिला बालविकास विभागाचे लक्ष आहे. अति कुपोषित असलेल्या मुलांवर स्थानिक ग्रामपंचायतींचे विशेष लक्ष असून, दररोज अंगणवाडीसेविका त्या मुलांना दिल्या जाणाऱ्या आहाराची माहिती घरी जाऊन घेत आहेत. मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या कुपोषित मुलांना ६० दिवसांचा पोषक आहार पुरवण्यात आला आहे. मुलांना कशा पद्धतीने आहार दिला पाहिजे, याची संपूर्ण माहिती पालकांना देण्यात आली असून, त्या मुलांमध्ये सुधार होत असल्याचा दावा महिला व बालविकास विभागाने केला आहे.