आता नवा घोळ ! पुण्यात आता कोरोनाच्या ४४ हजार लसींचा हिशेबच लागेना.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 09:13 PM2021-03-15T21:13:36+5:302021-03-15T21:15:21+5:30

खासगी लसीकरण केंद्राकडून माहिती भरण्यास टाळाटाळ : प्रत्येक दिवशी लसीकरणाची माहिती अद्ययावत करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना.

Pune District administration not able to tally 44 thousand covid vaccines. Blame the private centres for not updating information | आता नवा घोळ ! पुण्यात आता कोरोनाच्या ४४ हजार लसींचा हिशेबच लागेना.

आता नवा घोळ ! पुण्यात आता कोरोनाच्या ४४ हजार लसींचा हिशेबच लागेना.

Next

निनाद देशमुख
  जिल्ह्यात १६ तारखेपासून कोरोना लसीकरण सुरू झाले. जिल्ह्यात लसीकरणासाठी आतापर्यंत कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्डचे दीड लाख डोस मिळाले. यातील १ लाख ८ हजार ५५६ डोस देण्यात आले आहे. मात्र, काही खासगी लसीकरण केंद्राने वेळोवेळी लसीकरणाची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला न दिल्यामुळे, तसेच समन्वय न ठेवल्यामुळे जवळपास ४४ हजार ९४४ डोसचा हिशेब लागत नसल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे काही खासगी लसीकरण केंद्रांकडून पुन्हा लसीकरणाची माहिती मागवण्यात येत असून, रोजच्या रोज किती लसीकरण झाले याची माहिती अद्ययावत करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाने या खासगी केंद्रांना दिले आहे.  
       जिल्ह्यात जवळपास ११४ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. तर, ५५ केंद्र हे खासगी लसीकरणासाठी निवडण्यात आले होते. यातील २५ केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच, फ्रन्ट लाईन वर्कर यांचे लसीकरण आधी करण्यात आले. १६ जानेवारीपासून या कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वयोगटांतील सहव्याधी असलेल्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २९ हजार ४९१ वृद्ध व्यक्तींना, तर ४५ ते ५९ वयोगटांतील सहव्याधी असलेल्या ५ हजार १६१ जणांनाचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी १ लाख ५३ हजार ५०० डोस मिळाले होते. त्या पैकी १ लाख ८ हजार ५५६ जणांना लस दिली गेली.
    लसीकरण झाल्यावर दिवसभरात किती डोस देण्यात आले, याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना आरोग्य विभगाने सर्व लसीकरण केंद्रांना दिल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही खासगी केंद्रांकडून ही माहिती रोजच्या रोज अद्ययावत होत नसल्याने रोज किती डोस दिले गेले, याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली नाही. ही माहिती न मिळाल्याने ४४ हजार ९४४ डोसेसचा हिशेब आरोग्य विभागाला लागत नसल्याने पुन्हा या केंद्राकडून ही माहिती घेतली जात आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना रोज देणे गरजेचे आहे. यासाठी त्यांच्याशी समन्वय ठेवणे गरजेचे असताना रोजच्या लसीकरणाबाबत समन्वय होत नसल्याने माहिती अद्ययावत होत नाही.
       आरोग्य विभागाने याची गंभीरपणे दखल घेतली असून, लसीकरणाची माहिती रोजच्या रोज अद्ययावत करून तालुक्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांना द्यायला सांगितली आहे. ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला रोज देणार आहे.. 
दरम्यान याविषयी विचारल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले ," जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि काही खासगी केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. लसीकरणाची सर्व माहिती रोजच्या रोज अद्ययावत होणे गरजेचे आहे. मात्र, काही खासगी केंद्रांवर समन्वय नसल्याने ही माहिती रोज अद्ययावत होत नसल्याने लसीकरणात तफावत आढळत आहेत. यामुळे या केंद्रांना लसीकरणाची माहिती रोज अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे"

 

Web Title: Pune District administration not able to tally 44 thousand covid vaccines. Blame the private centres for not updating information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.