पुणे जिल्हा बँकेची योजना आता राज्यात राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:08+5:302021-03-16T04:11:08+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतकरी ग्राहकांना व नियमित परतफेड ...

Pune District Bank scheme will now be implemented in the state | पुणे जिल्हा बँकेची योजना आता राज्यात राबविणार

पुणे जिल्हा बँकेची योजना आता राज्यात राबविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतकरी ग्राहकांना व नियमित परतफेड करणाऱ्या तब्बल ४ लाख शेतकरी ग्राहकांना दरवर्षी शून्य टक्के दराने पीककर्ज पुरवठा केला जातो. पुणे जिल्हा बँकेची ही योजना आता राज्य शासनाने संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राज्यात एक नंबरची जिल्हा बँक आहे. या बँकेकडून दरवर्षी आपले प्रमुख ग्राहक असलेल्या शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचे कर्जवाटप केले जाते. पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी खेड्यापाड्यात बँकेने आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. पतपुरवठ्यासाठी जिल्हा बँक एकमेव अाधार ठरत आहे. यामुळेच जिल्हा बँकेमार्फत दरवर्षी तब्बल १ हजार ६०० कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप केले जाते. यामध्ये नियमित व मुदतीत कर्जांची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दरानेच कर्ज मिळते.

शेतकऱ्यांना ६ टक्के व्याजदराने विकास सोसायटीकडून अल्पमुदत पीक कर्जपुरवठा करण्यात येतो. जे शेतकरी अल्पमुदत पीककर्ज घेऊन त्याची निर्धारित वेळेत परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून ३ लाखांपर्यंत ३ टक्के व राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत १ लाखापर्यंत ३ टक्के व १ लाखावर ते ३ लाखांपर्यंत १ टक्के व्याज परतावा मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांना १ लाखापर्यंतचा पीक कर्जपुवठा शून्य टक्के व्याजदराने व १ लाखाचेवर ते ३ लाखांपर्यंत कर्जपुरवठा २ टक्के व्याजाने उपलब्ध होतो. जिल्हा बँकेकडून देखील वेळेत कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदरात सवलत दिली जाते. यामुळेच जिल्हा बँकेच्या लाखो शेतकरी ग्राहकांना शून्य टक्के दराने कर्जपुरवठा उपलब्ध होतो.

पुणे जिल्हा बँकेचा शून्य टक्के व्याजाने कर्जपुरवठ्याचा हा पॅटर्न आता संपूर्ण राज्यात पीडीसीसी पॅटर्न म्हणून राबविण्यात येणार आहे. नुकत्याच राज्याच्या अर्थसंकल्पात बँके गेले अनेक वर्षे नेतृत्व करणारे व उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ही घोषणा केली.

--

बँकेच्या चांगल्या कामाची शासनाकडून दखल

पुणे जिल्हा बँक शेतकरी मालक असलेली राज्यातील आदर्श बँक आहे. बँकेच्या वतीने गेले दहा वर्षांपासून तीन लाखांपर्यंत नियमित व वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य टक्के दराने कर्जपुरवठा करत आहे. दरवर्षी ४ लाखांपेक्षा अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. बँकेच्या या चांगल्या कामाची दखल घेऊन शासनाने आता ही योजना संपूर्ण राज्यात पीडीसीसी पॅटर्न म्हणून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

- रमेश थोरात, अध्यक्ष, पुणे जिल्हा बँक

Web Title: Pune District Bank scheme will now be implemented in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.