पुणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकारी देशमुखांचा दणका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:35 PM2022-04-05T19:35:02+5:302022-04-05T19:37:24+5:30

आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप...

pune district collector rajesh deshmukh slams nationalized banks in pune district | पुणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकारी देशमुखांचा दणका

पुणे जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांना जिल्हाधिकारी देशमुखांचा दणका

Next

पुणे :पुणे जिल्ह्यात देखील जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी यवतमाळप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकांना दणका दिला. पीक कर्ज शंभर टक्के वाटप करा अन्यथा सर्व शासकीय बँक खाती बंद करण्याचा इशारा देताच पुणे जिल्ह्यात आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक पीक कर्ज वाटप करण्यात आले. यामध्ये प्रथमच राष्ट्रीयकृत बँकांनी शंभर कर्ज वाटप करत आघाडी घेतली.

पुणे जिल्ह्याने किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्याच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात जास्त कर्ज वाटप करुन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यावर्षी एकूण ३ हजार ८९२ कोटी ४० लाख रुपये इतके कर्ज वाटप जिल्ह्यात झाले असून ३ लाख ७७ हजार ४१० शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी स्वत: पुढाकार घेत सर्व बँकांशी संपर्क साधत कर्जवाटपातील अडचणी दूर करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्यामुळे हे शक्य झाले आहे.

यापूर्वी २०१५-१६ साली ३ हजार ५०६ कोटी ६१ लाख रुपये इतके कर्ज वाटप झाले होते. त्यापेक्षा ३८५ कोटी ७९ लाख रुपये अधिक पीक कर्जवाटप यावर्षी झाले आहे. यावर्षी ३ हजार ८८२ कोटी रुपये एवढे उद्दिष्ट असतांना त्यापेक्षा १० कोटी ४० लाख रुपये अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

कर्ज वाटपाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी जून महिन्यापासून सर्व बँकांकडे वेगवेगळ्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. खरीप हंगामामध्ये २ हजार ७५८ कोटी ८२ लाख रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा १८१ कोटी ८० लाख रुपयांनी कमी कर्जवाटप झाले होते. ही तफावत रब्बी हंगामातील कर्जवाटपाद्वारे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी वेळोवेळी पीक कर्जाचा स्वतंत्र आढावा घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले. कर्जवाटप प्रक्रीयेतील अडचणीदेखील दूर करण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आणि प्रसंगी संबंधितांना आदेश दिले. या सर्व प्रक्रियेत जिल्हा अग्रणी बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे.

बँकांच्या जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापकांशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: दूरध्वनी व ई-मेलद्वारे संपर्क साधत अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला. तालुकापातळीवर होणाऱ्या बैठका तसेच दर महिन्याला पीक कर्ज वाटपाचा आढावा घेण्यात आला. परिणामी रब्बी हंगामामध्ये १ हजार १२३ कोटी १८ लाख रुपयांच्या उद्दिष्टापेक्षा १९२ कोटी २० लाख रुपयांनी अधिक कर्जवाटप करत दोन्ही हंगामातील एकूण कर्ज वाटप उद्दीष्टापेक्षा अधिक करण्यात यश मिळविले. त्यासाठी जिल्ह्यातील सरकारी क्षेत्रातील सर्व बँका, खाजगी क्षेत्रातील सर्व बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँक या सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १०४ टक्के कर्ज वाटप करून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ओलांडले. खाजगी क्षेत्रातील बँकांनी ९९.८१ टक्के कर्ज वाटप केले. तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २ हजार ३३३ कोटी ५५ लाख रुपये कर्ज वाटप करून कर्ज वाटपात मोठी भूमिका अदा केली आहे

Web Title: pune district collector rajesh deshmukh slams nationalized banks in pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.