पुणे जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा धरणसाठा अधिक; खडकवासला धरणातून ४२८ क्यूसेक विसर्ग
By श्रीकिशन काळे | Published: July 29, 2023 03:21 PM2023-07-29T15:21:52+5:302023-07-29T15:24:40+5:30
आज ३ वाजता ४२८ क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे...
पुणे :पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीमध्ये चांगला पाऊस बरसला आहे. त्यामुळे धरणसाठा ७४.१७ टक्के झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा अधिक आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये आज ३ वाजता ४२८ क्यूसेक विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्पाचे उपविभागीय अभियंत्यांनी दिली आहे.
यंदा पावसाने ओढ दिली होती. जूनमध्ये उशीरा मॉन्सून आला. तो देखील चांगला बरसला नाही. परंतु, जुलै महिन्यात धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे धरणसाठा गेल्यावर्षी पेक्षा यंदा १ टक्का अधिक आहे. गेल्या वर्षी २१.४६ टीएमसी साठा होता. म्हणजे ७३.६३ टक्के. यंदा ७४.१७ टक्के पाणीसाठा (२१.६२ टीएमसी) झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन्ही महिन्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. कारण गेल्या दोन वर्षांमध्ये सप्टेंबर महिन्यात मुसळधार पाऊस झाल्याच्या नोंदी आहेत. त्याने पुण्यात पुराची स्थितीही निर्माण झाली होती. यंदा तसे काही झाले तर त्यासाठी पुणे महापालिका सज्ज झालेली आहे. तूर्त शनिवारपासून पुणे शहरातील पाऊस ओसणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
धरणसाठा (टीएमसी)
खडकवासला : १.९४ (९८.४१ टक्के)
पानशेत : ८.४५ (७९.३४ टक्के)
टेमघर : २.०० (५४.०६ टक्के)
वरसगाव : ९.२२ (७१.९५ टक्के)
एकूण २१.६२ टीएमसी (७४.१७ टक्के)
गतवर्षी २१.४६ टीएमसी (७३.६३ टक्के)