पुणे जिल्ह्यात वाहतूक क्षेत्रामुळे सर्वाधिक प्रदूषण, ARAI संस्थेच्या आकडेवारीवरून स्पष्ट
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: September 19, 2022 03:26 PM2022-09-19T15:26:04+5:302022-09-19T15:27:39+5:30
क्लिन एअर प्रोजेक्ट इंडियातंर्गत सर्वेक्षण...
पुणे :पुणे जिल्ह्यात सर्वाधिक प्रदूषण वाहतूक क्षेत्रातून होत असून, त्याचा वाटा पीएम २.५ या कार्बन उत्सर्जनामध्ये २० टक्के आहे. रस्त्यावरील धूळ आणि उद्योगातून १९ टक्के कार्बन उत्सर्जन होत आहे. बांधकाम आणि इतरमध्ये १२ टक्के प्रमाण आहे.
या प्रदूषणामुळे हदयाच्या आजारांत वाढ होत आहे. त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी जनजागृती, जैवइंधनाचा वापर, नैसर्गिक गॅसचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक असल्याची माहिती पुण्यातील द ऍटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाचे (एआरएआय) वरिष्ठ उपसंचालक ए. ए. देशपांडे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या क्लिन एअर प्रोजेक्ट इंडिया या प्रकल्पासाठी एआरएआय संस्थेतर्फे पुणे जिल्ह्यातील प्रदूषणाचे वर्षभरात सर्वेक्षण करून त्याचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला आहे. या अहवालाचे प्रकाशन सोमवारी झाले.
यासाठी दिल्लीतील टेरी संस्थेचे सहकार्य आणि स्वीस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट यांनी निधी दिला आहे. याप्रसंगी एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक डॉ. एस. एस. ठिपसे, जनरल मॅनेजर मोक्तिक बावसे, टेरी संस्थेचे आर. सुरेश, डॉ. जॉनथन डिमेंगे, प्रोग्राम ऑफिसर ऍन्ड् डॅनियल, पुणे महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त माधव जगताप, पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे, स्वीस एजन्सी फा‘र डेव्हल्पमेंटचे डॉ. आनंद शुक्ला आदी उपस्थित होते.