राज्यात पैसेवाटपात पुणे जिल्ह्याची आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:05 AM2021-05-03T04:05:44+5:302021-05-03T04:05:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाॅकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे समाजातील दुर्बल व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी ...

Pune district leads in money distribution in the state | राज्यात पैसेवाटपात पुणे जिल्ह्याची आघाडी

राज्यात पैसेवाटपात पुणे जिल्ह्याची आघाडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : लाॅकडाऊन व कोरोनाचे संकट यामुळे समाजातील दुर्बल व गरीब कुटुंबाची उपासमार होऊ नये यासाठी महाआघाडी सरकारने सामाजिक अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा करण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्ह्यातील तब्बल ८७ हजार ३८१ लाभार्थ्यांसाठी २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करुन दिले आहे. सोमवार (दि.३) पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा करण्यास सुरूवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी दिली. दरम्यान या योजनेनुसार पैसे वाटप करण्यात पुणे जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे.

कोरोना संकटामुळे परिस्थिती लक्षात घेऊन २०२१-२२ या वर्षामध्ये आर्थिक व दुर्बल घटकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना इत्यादी योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल व मे २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीचे अर्थसाहाय्य एकत्रितपणे वितरण करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत येणाऱ्या सामाजिक व विशेष अर्थसाहाय्य योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झालेले रुपये २० कोटी २३ लाख ४२ हजार ७० रुपयांचे अनुदान १४ तालुक्यांना वितरीत केले.

दुर्बल घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा

वर नमूद सर्व योजनेतील समाविष्ट असणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील तसेच २१ हजारांच्या आत उत्पन्न असणारे दिव्यांग, निराधार, परितक्त्या, विधवा, घटस्फोटित, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी इत्यादी सर्व दुर्बल घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळणार आहे. ही रक्कम तातडीने जमा करण्याचे आदेश डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही सुरू

लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यावर तत्काळ रकमा जमा करण्याबाबतची तहसील कार्यालयामार्फत कार्यवाही सुरु आहे. लाभार्थ्यांनी बँकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून कोविड १९ च्या उपाययोजनांबाबतच्या अटी व शर्तींचे पालन करुन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Pune district leads in money distribution in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.