स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत उपक्रमांमध्ये पुणे जिल्हा राज्यात अव्वल
By नितीन चौधरी | Published: August 27, 2022 06:40 PM2022-08-27T18:40:59+5:302022-08-27T18:42:19+5:30
त्यानंतर नगर व गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक आहे....
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित उपक्रमांची संख्या व त्याची माहिती संकेतस्थळावर भरण्यात संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला असून राज्यात पुणे जिल्ह्याने अग्रस्थान पटकावत मानाचा शिरपेच खोवला आहे. देशात झालेल्यापैकी तब्बल ७५ टक्के उपक्रम राज्यात राबवण्यात आले आहेत. तर पुणे जिल्ह्याने तब्बल १ लाख २ हजार उपक्रम राबविल्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर नगर व गडचिरोली जिल्ह्यांचा क्रमांक आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव' १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशभरात विविध उपक्रम आयोजित करण्याचे निश्चित करण्यात होते. त्यासाठी केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या उपक्रमांची माहिती यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळावर भरणे अपेक्षित होते. त्यामध्ये संपूर्ण भारतातून ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा व राज्य या चारही स्तरावर सर्वात जास्त ४ लाख ४ हजार २८२ इतक्या उपक्रमांचे आयोजन व संकेतस्थळावर माहिती भरून महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
त्याखालोखाल झारखंड ४८ हजार ७०४ व गुजरात ४२ हजार ३९६ उपक्रम अंमलबजावणीसह अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावरील झारखंडपेक्षा तब्बल आठ पट अधिक उपक्रम महाराष्ट्राने राबवले आहे. महाराष्ट्रात राज्यस्तरावरील २१ उपक्रम, जिल्हा परिषद स्तरावर ३ हजार ५९२, तालुका पंचायत स्तरावर १० हजार ५७४ तर ग्रामपंचायत स्तरावर ३ लाख ९० हजार ९५ इतक्या उपक्रम आयोजनाची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली आहे.