विद्यार्थी ‘कुशल’तेत पुणे विभागाची आघाडी; तंत्रनिकेतनचे थेट कंपन्यांमध्ये प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:58 PM2017-10-23T15:58:19+5:302017-10-23T17:25:40+5:30
उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.
पुणे : उद्योग क्षेत्राला आवश्यक कौशल्य संपादन करण्याची संधी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील विद्यार्थ्यांना थेट कंपन्यांमध्ये जावून मिळू लागली आहे. त्यामुळे हे विद्यार्थी ‘कुशल’ होवू लागले असून उद्योग क्षेत्राकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये राज्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असून प्रत्यक्ष खासगी कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्यास सुरूवात झाली आहे.
तंत्र शिक्षणची पदवी, पदविका मिळवूनही योग्य प्रशिक्षणाअभावी बेरोजगारीला सामोरे जावे लागलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापूर्वी तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये जावून काम करण्याचा अनुभव मिळत नव्हता. त्यामुळे तेथील कामाची संस्कृती, स्वरूप अशा विविध बाबींपासून हे विद्यार्थी कोसो दूर होते. ही बाब लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने एक पाऊल पुढे टाकत सुधारीत अभ्यासक्रमातच या गोष्टींचा समावेश केला आहे. त्यानुसार तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांना चौथ्या सत्रामध्ये दोन महिने कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मंडळाने इंडस्ट्री असोसिएशनसोबत करारही केला आहे. विशेष म्हणजे या कामाचे मुल्यांकन करून त्याचे गुणही विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. चालु शैक्षणिक वर्षापासून या अभ्यासक्रमाची सुरूवात झाली असून यामध्ये पुणे विभागाने आघाडी घेतली आहे.
पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यात उन्हाळी सुट्टीमध्ये सुमारे ३२०० विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण घेतले. हा सोलापूर पॅटर्न आता संपूर्ण पुणे विभागातील कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्येही राबविला जाणार आहे. त्यानुसार सध्या पाचव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. १ ते १३ डिसेंबर या कालावधीत कंपन्यांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी विद्यार्थी व खासगी कंपन्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात केवळ पुणे विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व उद्योगांमधील दरी कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यात सुरूवातीला केवळ पुणे विभागात अशाप्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात होणार्या या प्रशिक्षणासाठी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. या प्रशिक्षणामुळे कंपन्यांना आवश्यक ‘कुशल’ मनुष्यबळ मिळण्यास मदत होणार आहे. तसेच पुढील दोन-तीन वर्षांत तंत्रनिकेतनची मागणीही वाढणार आहे.
- एम. आर. चितलांगे, उप सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, पुणे विभाग