प्राप्तिकर संकलनात पुणे विभाग देशात अव्वल; मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:19 PM2018-01-19T12:19:43+5:302018-01-19T12:23:35+5:30
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल ७५ टक्के करसंकलन करून, पुणे विभागाने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. चालू आर्थिक वर्षांत बुधवार (दि.१७) अखेरीस ३७ हजार ३५६ कोटी रुपयांची नक्त वसुली झाली आहे.
पुणे : प्राप्तिकर विभागाने दिलेल्या उद्दिष्टापैकी तब्बल ७५ टक्के करसंकलन करून, पुणे विभागाने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. चालू आर्थिक वर्षांत बुधवार (दि.१७) अखेरीस ३७ हजार ३५६ कोटी रुपयांची नक्त वसुली झाली असून, एकूण कॉर्पोरेट करसंकलनात तब्बल २६.७० टक्क्यांच्या वृद्धीसह १९ हजार ३३२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. कॉर्पोरेट वृद्धीचा हा आकडा देशात अव्वल ठरला आहे. पुणे विभागाचे मुख्य प्राप्तिकर आयुक्त ए. सी. शुक्ला यांनी ही माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
इतिहासात प्रथमच पुणे विभागाने अशी कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षांत देशातील अव्वल पाच विभागांना दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ पुणे विभागाने उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केले आहे. ढोबळ करसंकलनात कॉर्पोरेट १९ हजार ३३२ आणि प्राप्तिकर २२ हजार ८५८ असा ४२ हजार १९० कोटी रुपयांचा कर जमा झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १८.७८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत (२०१६-१७) कॉर्पोरेट १५ हजार २५७ आणि प्राप्तिकर २० हजार २६३ कोटी रुपये झाला होता. ही रक्कम ३५ हजार ५२१ कोटी रुपये भरते.
देशात ढोबळ करसंकलनात कॉर्पोरेटचा वाटा ४ लाख ७३ हजार ७३९ कोटी असून, प्राप्तिकराद्वारे ३ लाख २८ हजार ९२६ कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम ८ लाख २ हजार ६६५ कोटी रुपये इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १३.४४ टक्के वाढ झाली आहे. पुणे विभागात नक्त करसंकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत २४.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आगाऊ करसंकलनात वाढ
आगाऊ करसंकलनात पुणे विभागात १९.४९, तर देशात सरासरी १२.७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या आर्थिक वर्षांत कॉर्पोरेटकडून ९ हजार ८४६, तर प्राप्तिकराद्वारे ५ हजार ३१२ असा १५ हजार १५८ कोटींचा भरणा झाला आहे. मागील आर्थिक वर्षांत (२०१६-१७) कॉर्पोरेटने ८ हजार ५२, प्राप्तिकरचा ४ हजार ६३३ असा १२ हजार ६८५ कोटी रुपयांचा भरणा झाला होता.