पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव कोरोना पॉझिटीव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:24 PM2021-03-16T15:24:29+5:302021-03-16T15:30:08+5:30
सौरभ राव हे विभागीय आयुक्त झाल्यानंतर कोरोना काळात लॉकडाऊन आणि आरोग्य विभागाचे अनेक महत्वाचे निर्णय आणि नियोजन त्यांच्या स्तरावर होत होते. राव यांनी नुकताच घेतला होता लसीचा पहिला डोस...
पुणे - पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटीव्ह आल्याने त्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीपासूनच सौरभ राव हे कोरोनाच्या संपूर्ण प्रक्रियेत कायम अग्रभागी राहिले होते. महापालिकेबरोबर वेगवेगळ्या भागांत प्रतिबंधित क्षेत्र करणे असो की कशा पद्धितीने नियमांची अंमलबजावणी करायची हे ठरवणे असो ते कायमच थेट या भागांना भेटी देत पाहणी करत नियोजन करत होते. विशेष म्हणजे लसीकरण मोहिमेतही ते अग्रभागी होते. तर, काही दिवसांपूर्वीच त्यांनी लसीचा पहिला डोसही घेतला होता.
सौरभ राव हे विभागीय आयुक्त झाल्यानंतर कोरोना काळात लॉकडाऊन आणि आरोग्य विभागाचे अनेक महत्वाचे निर्णय आणि नियोजन त्यांच्या स्तरावर होत होते. याच अनुषंगाने शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत बैठकीला त्यांनी हजेरी लावली होती आणि त्याबरोबरच कालपर्यंत काही बैठका घेतल्या होत्या. आज दुपारी त्यांचा कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह आल्याचा अहवाल आला आहे. सर्व सरकारी अधिकारी आणि पोलिस अधिकारी त्यांच्या संपर्कात असल्याने आता पुढील नियोजन कसे केले जाते ते पहावे लागणार आहे. तसेच, संपर्कातील अधिकाऱ्यांनाही क्वारंटाई राहवे लागणार असल्याचं दिसून येतंय.