दौंड-पुणे रेल्वे डेमूगाडीचे प्रस्थान उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:04 AM2018-06-13T01:04:06+5:302018-06-13T01:04:06+5:30
दौंड-पुणे डेमू रेल्वेगाडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले. पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही गाडी दररोज सुटणार असून, पहाटेच्या सुमाराला दौैंड-पुणे दरम्यान एखादी गाडी असावी, अशी मागणी विशेषत: पाटस, केडगाव, यवत, खुटबाव, कडेठाण या भागांतील प्रवाशांची होती. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्याने विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना सोईचे झाले आहे.
दौैंड - दौंड-पुणे डेमू रेल्वेगाडीचे प्रस्थान मोठ्या उत्साहात झाले. पहाटे पावणेसहा वाजण्याच्या सुमारास ही गाडी दररोज सुटणार असून, पहाटेच्या सुमाराला दौैंड-पुणे दरम्यान एखादी गाडी असावी, अशी मागणी विशेषत: पाटस, केडगाव, यवत, खुटबाव, कडेठाण या भागांतील प्रवाशांची होती. त्यामुळे ही गाडी सुरू झाल्याने विशेषत: ग्रामीण भागातील प्रवाशांना सोईचे झाले आहे.
येथील फलाट क्रमांक ३ वर या गाडीच्या प्रस्थानावेळी पुणे विभागाचे सहायक परिचालन व्यवस्थापक सुरेश जैन, सहायक वाणिज्य व्यवस्थापक संजय सिंग, दौंड रेल्वे स्थानक व्यवस्थापक स्यामुल क्लिफ्टन, वाहतूक निरीक्षक आर. बी. सिंग, रेल्वे पोलीस अनिता पठारे, दौंड-पुणे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, सचिव विकास देशपांडे, कार्याध्यक्ष गणेश शिंदे, पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य अयुब तांबोळी याप्रसंगी उपस्थित होते.
दौंड ते पुणे पहाटेची ४:२० ला सुटणारी शटल अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने बंद केली. तेव्हापासून पाटस, कडेठाण, केडगाव, खुटबाव, यवत, उरुळी, लोणी, मांजरी या रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे असंख्य दैनंदिन प्रवासी अडचणीवर मात करत प्रवास करत असतात.
एप्रिल २०१५ ला मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक मुंबई यांना याबाबत क्षेत्रीय सल्लागार समितीच्या बैठकीत प्रस्ताव दिला. त्यानंतर सातत्याने तीन वर्षे पाठपुरावा करून पहाटे ५:४० वाजता दौंड येथून नवीन गाडी सोडण्याची मागणी अखेर रेल्वे प्रशासनाने मंजूर केली. त्यानुसार ही गाडी सुरू झाली.
दौंड ते पुणे दरम्यान हक्काची आणि वेळेवर धावणारी रेल्वे मिळाली असल्याने सर्वत्र आनंदी वातावरण आहे. प्रवासी संघाचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचे हस्ते नवीन गाडीचे उद्घाटन करण्यात आले व गाडीचे चालक वैभव दातार यांचा पुषपगुच्छ देऊन सन्मान केला तसेच सर्व अधिकाऱ्यांचादेखील सन्मान करण्यात आला. या वेळी पेढ्यांचे वाटप करण्यात आले.