ललित पाटील प्रकरणात नवे धागेदोरे उलगडणार? पत्र समोर आल्याने येरवडा प्रशासनाची अडचण वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 03:11 PM2023-11-21T15:11:00+5:302023-11-21T15:13:54+5:30
ललित पाटीलला रुग्णालयात ठेवण्यासाठी येरवडा कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी क्षुल्लक कारण दिल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली आहे.
पुणे - अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात दिवसागणिक नवनवे धागेदोरे उलगडत आहेत. या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टर आणि पुणे पोलिसातील दोन कर्मचारी दोषी आढळल्यानंतर आता येरवडा कारागृह प्रशासनही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. कारण येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरने लिहलेलं एक पत्र समोर आलं असून येरवडा कारागृहातूनही ललित पाटीलला मदत झाल्याचं सदर पत्रातून स्पष्ट झालं आहे.
येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरने लिहिलेल्या पत्रात येरवडा कारागृहाचे वैद्यकीय अधीक्षक हे आरोपी ललित पाटीलला उपचारांसाठी ससून रुग्णालयात भरती करून घेण्याची आणि किमान १५ दिवस त्याला तिथंच ठेवण्याची विनंती करत आहे. आमच्याकडे ललित पाटीलला रुग्णालयातून कारागृहात आणण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने ललितला तिथे ठेवण्यात यावं, असं क्षुल्लक कारण येरवडा कारागृह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका निर्माण झाली आहे.
एकीकडे, ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या आरोपात नुकतीच दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असतानाच हे पत्र समोर आल्याने येरवडा कारागृह प्रशासनाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. जून महिन्यात ससून रुग्णालयात भरती झालेला ललित पाटील नंतर पाच महिने ससून रुग्णालयातच होता. तसंच तो तेथूनच अमली पदार्थांचे रॅकेट चालवत होता.
दोन पोलीस कर्मचारी अटकेत आणि बडतर्फ
ललित पाटील याला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या आणि तो पळून गेल्याचा बनाव करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना नुकतेच पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस नाईक नाथाराम भरत काळे आणि पोलिस शिपाई अमित सुरेश जाधव अशी बडतर्फ केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अपर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले.
धंगेकरही झाले आक्रमक
"अमली पदार्थ तस्करीतील मुख्य आरोपी ललित पाटील याच्या प्रकरणात दोषी आढळलेले ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा आणि त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. त्यामुळेच ठाकूर यांना अद्याप अटक झालेली नाही. सरकारचे हे कृत्य चुकीचे आहे. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. अन्यथा, मला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल," असा इशारा पुण्यातील काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.