ज्ञानेश्वर माऊलींच्या हिरा अश्वाचा पुणे मुक्कामात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 11:34 AM2018-07-08T11:34:01+5:302018-07-08T12:18:03+5:30
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील श्रीमंत शितोळे सरकार यांच्या माऊलींच्या अश्वाचा रविवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे. या अश्वाचे नाव हिरा असे होते. गेल्या आठ वर्षापासून हा अश्व माऊलींच्या वारीत सेवा देत होता. वारीच्या वाटेवरच अश्वाने अखेरचा श्वास घेतला. आळंदीहून शनिवारी (7 जुलै) पालखीसह अश्वांनी प्रस्थान केले होते. 30 किलोमीटर अंतर चालून अश्व शनिवारी रात्री पुणे येथे मुक्कामी पोहोचले आणि आज सकाळी माऊलींचा अश्व मृत्युमुखी पडल्याची बातमी समोर आली. या वृत्तामुळे वारकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
पालखी सोहळा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन अश्वाचे वारीसाठी त्वरीत आगमन होणार आहे. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या अश्वाचे वय 12 ते 13 वर्षांचे होते. पालखी प्रस्थान दिवशी हा अश्व श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली (बेळगांव) गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पुणे या 30 किलोमीटर वाटचाल केल्याची माहिती समोर आली आहे.