पुण्यात वाहन खरेदीचा उत्साह मंदावला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 06:52 PM2019-05-07T18:52:52+5:302019-05-07T18:53:59+5:30
गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर वाहन खरेदीचा उत्साह मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी असल्याचे दिसून आले.
पुणे : गुढीपाडव्याप्रमाणेच अक्षयतृतीयेच्या मुहुर्तावर वाहन खरेदीचा उत्साह मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी असल्याचे दिसून आले. मागील वर्षी अक्षय तृतीयेच्या सहा दिवसांत सुमारे ५ हजार ७०० वाहनांचे नोंदणी झाली होती. यंदा हा आकडा चार दिवसांत ३ हजार ७०० पर्यंतच स्थिरावला आहे. पुढील दोन दिवसांत ही तुट भरून येण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या दिवशी सोने खरेदीप्रमाणेच वाहन खरेदीचाही उत्साह असतो. यादिवशी वाहन घरी आणण्यासाठी मुहूर्ताच्या काही दिवस आधीपासूनच त्यासाठी मागणी वाढण्यास सुरूवात होते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, दि. ४ ते ७ मे या चार दिवसांच्या कालावधीत एकुण ३ हजार ७०६ वाहनांची विक्री झाली आहे. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ८५४ दुचाकी आहेत. मागील वर्षी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर दि. १६ ते २१ एप्रिल या सहा दिवसांच्या कालावधी एकुण ५ हजार ६९४ वाहनांची नोंदणी झाली होती. त्यामध्येही ३ हजार ७१४ दुचाकी होत्या. या आकडेवारीवरून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत घट झाल्याचे दिसते. यंदाच्या आकड्यांमध्ये दि. ८ व ९ मे यादिवशी आणखी भर पडू शकते. पण हा आकडा मागील वर्षीच्या वाहन संख्येपर्यंत पोहचण्याची शक्यता कमी आहे.
अक्षयतृतीयेच्या तुलनेत गुढीपाडव्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी होती. मागील वर्षी ७ हजार २७९ वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा हा आकडा ७ हजार १९८ एवढा होता. तुलनेने विक्रीमध्ये काहीशी घट झाल्याचे दिसते. हाच ट्रेंड अक्षयतृतियेच्या मुहुर्तावरही दिसून आला. मागील काही महिन्यांपासून वाहन क्षेत्रासह आर्थिक पातळीवर मंदीचे वातावरण असल्याने विक्री कमी होत असल्याचे असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर झालेली वाहन विक्री
. १६ ते २१ एप्रिल २०१८ | दि दि. ४ ते ७ मे २०१९ | |
दुचाकी | ३,७१४ | २,८५४ |
चारचाकी | १,२०३ | ६०३ |
तीनचाकी | ३८६ | ४६ |
जड वाहतुक | ७६ | ३८ |
इतर | ३१५ | १६५ |
एकुण | ५,६९४ | ३,७०६ |