पुणे : समान पाणीपुरवठा; एकच निविदा, मुदतवाढीनंतरही ठेकेदार अनुत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 06:54 AM2018-01-23T06:54:04+5:302018-01-23T06:54:21+5:30
महापालिकेची बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निविदा दाखल करण्यासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली.
पुणे : महापालिकेची बहुचर्चित समान पाणीपुरवठा योजनेच्या कामांसाठी निविदा दाखल करण्यासाठी आतापर्यंत तीन ते चार वेळा मुदतवाढ देण्यात आली. पंरतु वारंवार मुदतवाढ देऊनदेखील या कामांसाठी निविदा दाखल करण्यासाठी ठेकेदार अनुत्सुक असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुदतवाढ दिल्यानंतर सोमवारी निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता, परंतु अखेरच्या दिवशी पुन्हा एकाच ठेकेदाराने १ ते ५ झोनच्या कामांसाठी निविदा दाखल केली आहे.
महापालिकेकडून शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील सतराशे किमीची जलवाहिनी टाकणे, पाणी मीटर बसविणे, जलशुद्धीकरण केंद्राची कामे, तसेच योजनेची देखभालदुरुस्ती अशा विविध कामांचा समावेश आहे.
ही मुदतवाढ सोमवारी संपुष्टात आली. त्यात केवळ विश्वराज या एकाच ठेकेदार कंपनीने एक ते पाच झोनसाठी एक निविदा भरली आहे. दरम्यान, निविदांना मिळालेल्या या थंड प्रतिसादामुळे समान पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी निविदा प्रक्रियेला पालिका प्रशासन पुन्हा मुदतवाढ देते का, हे पाहावे लागेल.
या कामांसाठी प्रशासनाने शहराचे एकूण सहा झोन (विभाग) केले आहेत. त्यानुसार प्रशासनाने या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यासाठी याआधी पाच जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत झोन एक व चारसाठी एकही निविदा दाखल झाली नव्हती.
तसेच झोन सहासाठी सात कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या, तर उर्वरित झोन क्र. १, ३ आणि ५ साठी प्रत्येकी तीन निविदाच आल्या होत्या. एवढ्या मोठ्या योजनेसाठीच्या कामांना अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने झोन सहा वगळता अन्य सर्व झोनच्या कामांच्या निविदांना १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता.