पुणे : पार्किंग ठरताहेत वादाची ठाणी, नियोजन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 07:03 AM2018-01-23T07:03:35+5:302018-01-23T07:03:47+5:30

गेल्या काही वर्षांत शहराचा आकार अक्षरश: फुगत चालला आहे. मात्र, त्यात आपण किती हवा भरायची हे महापालिकेच्या नियोजनकारांनी आणि अभ्यासकांनी ठरविले पाहिजे.

Pune: Farewell to parking, planning required | पुणे : पार्किंग ठरताहेत वादाची ठाणी, नियोजन आवश्यक

पुणे : पार्किंग ठरताहेत वादाची ठाणी, नियोजन आवश्यक

Next

पुणे : गेल्या काही वर्षांत शहराचा आकार अक्षरश: फुगत चालला आहे. मात्र, त्यात आपण किती हवा भरायची हे महापालिकेच्या नियोजनकारांनी आणि अभ्यासकांनी ठरविले पाहिजे. अन्यथा त्यातून भीषण सामाजिक आणि कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. पार्किंगच्या वादातून संगणक अभियंत्याचा कोंढव्यात खून झाला. ही घटना अत्यंत गंभीर म्हणूनच पाहिली पाहिजे. अन्यथा पूर्वीच्या नळकोंडाळ््याप्रमाणे आधुनिक पार्किंग कोंडाळे वादाची आणि अनेकदा कायदा-सुव्यवस्था बिघडविणारी ठाणी बनतील.
वाहन पार्क केल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत नेविन बत्तीवाला (वय ३९, रा. लुल्लानगर, कोंढवा खुर्द) यांना आपले प्राण गमवावे लागले. याबाबत पोलीस आपले काम करतील.
कायद्याने गुन्हेगारांना शिक्षादेखील होईल. मात्र, एक गुन्हेगारी घटना म्हणून याकडे दुर्लक्ष करता कामा नये. सध्याची शहराची अवस्था पाहिल्यास, या सामाजिक शरीराने पुढील गंभीर आजाराचा दिलेला हा इशारा समजून आपण काम केले पाहिजे. या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यास आजार बळावण्याचीच शक्यता अधिक दिसते.
शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात असून, वाहनांच्या संख्येनेदेखील ३५ लाखांचा आकडा पार केला. त्यात अर्थात दुचाकींची संख्या ३० लाखांच्या घरात आहे. चारचाकी, स्कूलबस, रिक्षा, मोठी प्रवासी वाहने, टेम्पो, तीनचाकी टेम्पो अशा विविध प्रकारच्या वाहनांचा त्यात समावेश आहे. शहर मध्यवस्ती अपुरी पडू लागल्याने उपनगरे वेगाने विकसित (?) झाली. चाळी जाऊन इमले बनले.
अनेक स्थानिक लोक बांधकाम व्यवसायात पडले. त्यांनीदेखील इमारतींवर इमारती आणि इमल्यांवर इमले चढविण्यास सुरुवात घेतली. मध्यवस्तीतील सदनिकांचे दर परवडणारे नसल्याने अनेकदा अनधिकृत असूनही लोकांनी कोणताही विचार न करता घराचे स्वप्न एकदाचे पूर्ण करून घेतले.
महापालिकेचे डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशनचे (डीपीसीआर) पार्किंगचे कोणतेच नियम पाळले नाहीत.
वास्तविक पाहता निवासी आणि व्यावसायिक ठिकाणी वाहन पार्किंगसाठी किती जागा असावी, येणाºया अभ्यागतांसाठी किती जागा ठेवावी, चारचाकी, दुचाकी आणि सायकल अशा सर्व वाहनांसाठी किती जागा सोडावी, अशी शास्त्रशुद्ध नियमावली तयार केली आहे.
मात्र, ही नियमावली कागदावरच राहिल्याचे सहज लक्षात येते.
आज कोणतेही उपनगर आणि शहर मध्यवस्तीत रात्रीच्या वेळी
फेरफटका मारल्यास पार्किंगची कुव्यवस्था पाहायला मिळू शकते. अगदी पीएमपी वाहनेदेखील शहरातील विविध भागांत रस्त्यावरच लावलेली आढळतात.
उपनगरांच्या भागांतदेखील अभावानेच वाहन पार्किंगची जागा सोडली असल्याने बहुतांश वाहने, रस्त्यावर येतात. प्रत्येक घरटी सरासरी तीन दुचाकी वाहने पाहायला मिळतात. साधारण तीन चार घरांमागे एक चारचाकी वाहन आहेच. पूर्वी पाण्यासाठी नळकोंडाळ््यावर भांडणे होत.
सध्याची स्थिती पाहिल्यास या वादात वाढच होत जाणार आहे. राजकीय कार्यकर्त्यांचे अपयश, महापालिकेतील अधिकाºयांचे दुर्लक्ष, अतिक्रमण विभागाचे अपयश यामागे आहेच. मात्र, अशा चर्चेत पडण्यापेक्षा यावर मार्ग काढण्यासाठी निदान चर्चा झाल्या पाहिजेत. त्यावर उपाय योजले पाहिजेत.
अगदी पूर्वीच्या सार्वजनिक नळकोंडाळ््याप्रमाणे सार्वजनिक वाहनतळ सुविधांचे जाळे उभारता येतील का? हेदेखील पाहिले पाहिजे. अन्यथा अशा वादांतून हिंसेच्या घटना या नेहमीच्याच होतील.
आता वाहन वार्किंगसाठी शेजारी भांडू लागले आहेत. अनेकदा त्रयस्थांची वाहनेही आपल्या घरासमोर पार्क केलेली आढळतात.
अशाच वादातून नºहे आंबेगाव येथे वाहन जाळपोळीचा प्रकार घडला होता.

Web Title: Pune: Farewell to parking, planning required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.