भाव नसल्याने कांदा, टोमॅटो सडतोय, शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 03:00 AM2018-05-09T03:00:53+5:302018-05-09T03:00:53+5:30
कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला असून, साठवलेला कांदा सडू लागल्याने हा कांदा फेकून द्यायची पाळी शेतक-यांवर आली आहे.
राजुरी - कांद्याला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला असून, साठवलेला कांदा सडू लागल्याने हा कांदा फेकून द्यायची पाळी शेतक-यांवर आली आहे.
जुन्नर तालुक्यात गेल्या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली होती. कारण एक-दीड वर्षापूर्वी कांद्याला जवळजवळ किलोला चाळीस ते पन्नास रुपये बाजारभाव मिळत होता. त्यामुळे कांद्याला चांगल्या प्रतीचा बाजारभाव मिळेल या आशेने मोठ्या प्रमाणात लागवड झाली होती. परंतु
गेल्या वर्षापासून कांद्याला किलोमागे दोन ते तीन रुपये असा बाजारभाव मिळत आहे.
इतका कमी बाजारभाव मिळत असल्याने कांद्याच्या पिकाचा झालेला खर्चसुद्धा निघत नसल्याने भविष्यात कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने कांदा बराकीत साठवून ठेवला होता. सध्या कांद्याला किलोमागे सहा ते सात रुपये बाजारभाव आहे.
कांद्याला बाजारभाव वाढत नसल्याने हा साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी काढण्यात आला. परंतु शेतकºयांनी जो कांदा साठवून ठेवला आहे तो कांदा पूर्णपणे सडलेला आहे.
-तालुक्याच्या पूर्व भागातील बोरी बुद्रुक या गावातील एका शेतकºयाने जवळजवळ पाचशे गोणी भरतील इतका कांदा साठवून ठेवला होता.
-त्यांनी हा कांदा आता विक्रीसाठी काढला असता त्यांच्या पाचशे गोणींपैकी फक्त शंभर गोणी चांगल्या निघाल्या असून, त्यांच्या चारशे गोणी भरतील इतका कांदा सडलेला निघाला आहे.
-हा सडलेला कांदा टाकायचा कुठे? तर त्यांनी हा कांदा त्याच्या शेतात पांगून दिला आहे. त्यातच या वर्षी नवीन कांदा बाजारात आला असून याही कांद्याला कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.
मांजरी उपबाजारात शेतकºयांनी काही टन भाजीपाला दिला फेकून
मांजरी : मांजरी बुद्रुक येथील पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अण्णासाहेब मगर उपबाजारात दलालांचा हस्तक्षेप वाढला आहे. दुबार बाजारामुळे शेतकºयांच्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. मार्केट प्रशासनाला वारंवार ही बाब लक्षात आणून दिल्यानंतरही यात फरक पडत नसल्याचे पाहून आज शेतकºयांनी काही टन भाजीपाला फेकून देऊन बाजार समिती प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.
शेतात दिवसरात्र काबाडकष्ट करून पिकवला जाणारा शेतमाल दलाल व व्यापाºयांच्या दुष्टचक्रात अडकून योग्य भाव व नफा कधीच शेतकºयापर्यंत पोहोचत नाही. त्याच वेळी भेसळयुक्त माल ग्राहकाच्या माथी चढ्या किमतीत मारला जातो.
शेतकºयांच्या मालाला योग्य भाव मिळावा व ग्राहकांनाही शुद्ध व चांगल्या प्रतीचा भाजीपाला मिळावा, हा हेतू समोर ठेवून पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीने मांजरी बुद्रुक येथे अण्णासाहेब मगर उपबाजार सुरू केला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक असा बाजार येथे होणे अपेक्षित आहे, मात्र गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक भाजीपाल्यात दलाल (मध्यस्थ) वाढले आहेत. त्यामुळे मूळ शेतकºयांना त्यांनी विक्रीस आणलेल्या भाजीपाल्याला भाव मिळत नाही. व्यापारी आणि माल घेणारे यांची साखळी तयार होत असल्याने शेतकºयांना संध्याकाळपर्यंत ग्राहक मिळत नाहीत. त्यामुळे एक अतिशय कमी भावाने किंवा उधारीवर शेतीमाल विकावा लागत आहे. येथे व्यापारीवर्गाचा वाढलेला सुळसुळाट आणि शेतकºयांची होणारी पिळवणूक याबाबत बाजार समितीच्या प्रशासनाला वारंवार कळवूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे आज त्रासलेल्या शेतकºयांनी आपला शेतीमाल फेकून दिला, असे बाजार समितीत आलेल्या शेतकºयांनी सांगितले.
व्यापारी लोक बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणचा माल गोळा करून मार्केटमध्ये विक्रीस आणतात, त्या जादा मालामुळे बाजारभावात तफावत निर्माण होते. व्यापारी रोज मार्केटमध्ये माल आणतो. तसा शेतकरी दिवसाआड माल आणतो. तसेच व्यापाºयांना शेतमाल विक्रीस परवानगी नाही. त्यामुळे बाजार समितीने अशा घुसखोर व्यापाºयांवर निर्बंध आणले पाहिजेत, येत्या काही दिवसांत त्यांच्यावर निर्बंध आणले नाही तर मोठे आंदोलन करण्यात येईल.
- अशोक आव्हाळे, शेतकरी, मांजरी खुर्द
मांजरी उपबाजारात पूर्व हवेलीतून तर माल येतोच, परंतु दौंड, बारामती, श्रीगोंदा या ठिकाणाहून पण शेतमाल विक्रीस येतो. बाजार समितीने माल विक्रीस शेतकºयांसाठी खुला केला आहे, परंतु काही व्यापारी शेतकºयांकडूनच शेतात जाऊन माल खरेदी करतात व मार्केटमध्ये विक्रीस आणतात, त्यामुळे आपण त्यांना कसे रोखू शकतो? यासाठी सचिवांशी आमची चर्चा झाली आहे. लवकरच यावर तोडगा काढला जाईल.
-देविदास शेवाळे, विभागप्रमुख अण्णासाहेब मगर उपबाजार समिती, मांजरी