ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला; आतापर्यंत ७६ लाख शेतकऱ्यांना मिळाला ओळख क्रमांक
By नितीन चौधरी | Updated: March 12, 2025 09:48 IST2025-03-12T09:47:40+5:302025-03-12T09:48:47+5:30
राज्यात असे १५ लाखांहून अधिक अर्ज तलाठ्यांच्या मान्यतेविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला; आतापर्यंत ७६ लाख शेतकऱ्यांना मिळाला ओळख क्रमांक
पुणे : ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा नोंदणीतील सहभाग वाढला आहे. राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्याने आघाडी घेत ५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
दरम्यान, आधार कार्डावरील माहिती आधारे हे ओळखपत्र देण्यात येत असून, आधारमधील ८० टक्के माहिती जुळली तरी ओळख क्रमांक देण्यात येत आहेत. आता त्यापेक्षा कमी माहिती जुळत असली तरी पडताळणी करून अशा अर्जांवरही तलाठ्यांनी कार्यवाही करावी, असे निर्देश भूमी अभिलेख विभागाने दिले आहेत. मात्र, असा अर्ज स्वीकारण्याचा किंवा फेटाळण्याचा अधिकार तलाठ्यांनाच असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात असे १५ लाखांहून अधिक अर्ज तलाठ्यांच्या मान्यतेविना प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.
केंद्र सरकारने या योजनेचा २० वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांना थेट निधी हस्तांरणाद्वारे जमा केला आहे. मात्र, २१ व्या हप्त्यासाठी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी करण्यासाठी सहभाग वाढविला आहे. त्यानुसार राज्यात आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
यात आतापर्यंत आघाडीवर असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्याने अव्वल क्रमांक कायम ठेवला असून, जिल्ह्याने ओळख क्रमांकाचा पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५ लाख ९ हजार ९८८ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. त्या खालोखाल नाशिक जिल्ह्यात ४ लाख ५० हजार ६४० शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्हा आहे. जिल्ह्यात ४ लाख ३४ हजार ६३२ शेतकऱ्यांना ओळख क्रमांक देण्यात आला आहे.
जिल्हानिहाय ओळख क्रमांक
अकोला १५,१२७८
अमरावती २४,७२६६
बुलढाणा ३०४७३७
वाशिम १३१२५९
यवतमाळ २६६५९०
बीड २९०१९५
संभाजीनगर २५२८७१
धाराशिव १७५९०६
हिंगोली १४८५९४
जालना २२०२४२
लातूर १९९४७५
नांदेड २५१०१७
परभणी १८५००३
पालघर ७८२०१
रायगड ७४४९२
रत्नागिरी ११२५३४
सिंधुदुर्ग ७३४१६
ठाणे ५४,२५८
भंडारा १६२१५८
चंद्रपूर १९२५१६
गडचिरोली १२१५६५
गोंदिया १९०६४४
नागपूर १४७३२८
वर्धा १५२७५१
अहिल्यानगर ५०९९८८
धुळे १४९८१८
जळगाव ३७६८७८
नंदुरबार ९५५८२
नाशिक ४५०६४०
कोल्हापूर ३८३५४२
पुणे ४३४६३२
सांगली २६४७३२
सातारा ४०३१६६
सोलापूर ३८९२३२
मुंबई उपनगर ३४६
एकूण : ७६,३९,८५२
राज्यात ॲग्रीस्टॅक योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढत आहे. तलाठ्यांकडून योजनेला गती देण्यात आली आहे. तसेच आधार माहिती जुळण्याबाबत पडताळणी करून तो अर्ज मान्य करण्याबाबत सांगण्यात आले आहे. - सरिता नरके, राज्य संचालक, ॲॅग्रीस्टॅॅक, भूमिअभिलेख विभाग, पुणे