पुणे : चाकण बाजारात मंदी, भाज्यांचे भाव गडगडल्यानं शेतकरी चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 06:14 PM2018-02-08T18:14:25+5:302018-02-08T18:26:39+5:30
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला
चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भाज्या मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाशिवरात्रीला 6 दिवस अवकाश असल्याने गुरुवारी बाजारात आंध्र प्रदेशातून आलेला 16 टन रताळी घेऊन आलेला ट्रक मागणी अभावी बाजारात उभा राहिला. ट्रक उभा करून त्या व्यापाऱ्याला उद्या, परवाच्या बाजाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथील बाजारात बटाटा ७०० रुपये, तर कांद्याला १७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला.
चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी विभागात वातावरणातील बदलामुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन भाज्यांचे भाव गडगडले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मेथीची बाजारात मोठी आवक झाली.
भाज्यांना प्रतिकिलोस मिळालेले भाव
कोबी - 2 ते 3 रुपये
फ्लॉवर - 2 ते 3 रुपये
टोमॅटो - 4 ते 5 रुपये
बीट - 2 ते 4 रुपये
दुधी भोपळा - 4 ते 5 रुपये
ढोबळी मिरची - 10 ते 12 रुपये
काकडी - 10 ते 15 रुपये
गाजर - 12 ते 14 रुपये
वाटाणा - 15 ते 20 रुपये
तेजीत असलेल्या भाज्या
भेंडी - 20 ते 25 रुपये
गवार - 25 ते 30 रुपये
शेवगा - 30 ते 35 रुपये
हिरवी मिरची - 30 ते 35 रुपये
पालेभाज्यांचे जुडीचे भाव पुढीलप्रमाणे
शेपू - दीड ते 2 रुपये
मेथी - 2 ते 3 रुपये
पालक - 2 रुपये
कोथिंबीर - 2 रुपये