Pune Fashion Street Fire : रौद्र रूप धारण केलेल्या अग्निकांडात स्वतःच्या जीवाची बाजी लावून मदतीला धावलेला 'अवलिया'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:32 PM2021-03-29T13:32:47+5:302021-03-29T14:36:37+5:30
विशेष म्हणजे या तरुणाचे फॅशन स्ट्रीट मध्ये कोणतेही दुकान नाही..
विक्रम मोरे-
पुणे : फॅशन मार्केट येथे रात्री ११ च्या दरम्यान लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण करत तांडव माजवले असतानाही येथे भीमपुरा येथील कुरेशी मोहल्ल्यात राहणाऱ्या काशिफ चौधरी या तरुणाने आपल्या जीवाची बाजी लावत इथल्या व्यावसायिकांचे सामान सुरक्षितपणे कसे बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आपल्या सर्व मित्रांना सोबतीला घेत त्याने प्रचंड वेगात कार्यरत असताना दिसून आला.
विशेष म्हणजे काशिफचे या मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारचे दुकान नाही. केवळ आपली मित्र मंडळी येथे व्यवसाय करतात आणि आपण जवळच राहतो म्ह्णून एक सामाजिक कर्तव्य म्हणून कोणीही आत जाण्यासाठी तयार नसताना स्वतः धाडस करत जेवढं सामान काढता येईल तेवढं त्यानं बाहेर काढायला स्वतः सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मदतीला इतर जण देखील धावून आले. त्यामुळे थोडं काही समान वाचू शकले. सामान बाहेर काढल्यानंतर पोलीस व अग्निशामक दलाच्या प्रशासनालाही त्याने सकाळी ६ वाजेपर्यंत मदत केली. हे करत असताना त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात आगीच्या वाफा लागल्या आणि डोक्यावरचे केसही जळाले.
याविषयी कशिफ चौधरी म्हणाला, हे खूप वाईट झालंय, यामुळे अनेक तरुण आज रस्त्यावर आलेत. मी स्वतः त्या रात्री फायर ब्रिगेड ला फोन केला होता परंतु , ते ३० ते ४० मिनिटं उशिरा आले खरंतर त्यांना संचारबंदी असताना आणि रात्री ११ नंतर यायला ५ मिनिटं पुरेशी होती . जर ते वेळेत आले असते तर हा अनर्थ नक्की टाळला असता. हे सांगताना त्याचा घसा पूर्णपणे बसला होता आणि डोळ्यात अश्रू दिसून तरळत होते.