Pune Fashion Street Market Fire: पुणे फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात; लाखोंचं नुकसान, आगीतून निघतायेत संशयाचे धूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 02:21 AM2021-03-27T02:21:52+5:302021-03-27T06:20:54+5:30
कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती.
पुणे - पुण्यातल्या कॅम्प परिसरातल्या फॅशन स्ट्रीटला रात्री ११ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, अनेक दुकाने जळून खाक झाली, अग्निशमन दलाचे १५ बंब घटनास्थळी पोहचले असताना गर्दीमुळे आग विझवण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या, साधारण २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं.( Fire breaks out at Fashion Street market in Camp area of Pune)
कॅम्प परिसरातलीच आगीची पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे. काहीच दिवसांपूर्वी शिवाजी मार्केटमध्ये देखील आग लागली होती. पुण्यातील कॅम्प परिसरात फॅशन स्ट्रीट हे प्रसिद्ध कपड्यांचे मार्केट आहे. अत्यंत तोकड्या जागेत असलेले हे मार्केट अनेक पुणेकरांचे आकर्षण राहिलं आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे लाखोंचे रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही वर्षांपासुन हे मार्केट इथून हलवण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आग नेमकी लागली कशी याची चौकशी करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.
Around 16 fire tenders & 2 water tankers are present here. At around 1:06 am, the fire was brought under control. Cooling operation on. 60 fire officials including 10 officers are at the spot: Prashant Ranpise, Chief Fire Officer of Pune Municipal Corporation
— ANI (@ANI) March 26, 2021
लोकमतशी बोलताना एक व्यापारी म्हणाले “आग लागल्यानंतर आम्ही लगेचच फायर ब्रिगेडला कळवले. मात्र जवळपास दीड तासाने फायर ब्रिगेड इथे दाखल झाले. त्यामुळे जास्त नुकसान झाले आहे, या ठिकाणी कोणती खाऊ गल्ली नाही. साधी चहाची टपरी देखील नाही. त्यामुळे इथे आग लागली तरी कशी हा प्रश्न आहे. आमचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची आवश्यकता आहे” असे आणखी एका व्यापाऱ्यांनी सांगितले.
Fire has been controlled. No casualty has been reported so far but heavy loss to the hawkers & shop owners as their shops were gutted in fire: Fire Department, Pune #Maharashtra
— ANI (@ANI) March 26, 2021
काही मिनिटांतच आग वाऱ्यासारखी पसरली
११ च्या सुमारास ही आग लागलेली असताना बघता बघता संपूर्ण मार्केट जळून खाक झाले, आगीचे गोळे आकाशात दूरवर दिसत होते, अंदाजे २००० च्या वर कपडे, चप्पल, गॉगलची दुकाने आहेत, काही मिनिटांतच संपूर्ण मार्केट जळून खाक, २००० साली एम जी रोड वरील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी १ वर्षाच्या कालावधीपुरतं फॅशन स्ट्रीट (जुने कांबळे मैदान) याठिकानी जागा देण्यात आली होती. त्याचे आजतागायत नूतनीकरण झालेले नाही त्यावेळी व्यापाऱ्यांची संख्या ४०० होती, आज हीच संख्या २ हजाराहून अधिक झाली आहे. पार्किंगमध्येही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करत दुकाने थाटण्यात आली होती, येथे अनेक व्यापारी संघटना अस्तित्वात आहे.
आगीत काही कोटींचे नुकसान झाले असून आत जाण्यासाठी मार्ग नसल्याने मोहम्मद रफी चौक, मोती बिल्डिंगची गल्ली, आणि फॅशन स्ट्रीटच्या बाहेर फायर ब्रिगेडच्या गाड्या थांबवल्या होत्या. २०१७ मध्ये मुंबईतील कमला मिल परिसरात आगीची दुर्घटना घडली होती, त्यानंतर पुणे येथील फॅशन स्ट्रीटचे कॅन्टोन्मेंट, पुणे मनपा व पिंपरी चिंचवड मनपाने २०१८ साली संयुक्त रित्या फायर ऑडिट करत फॅशन मार्केट धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता.