बाईपण समजून घेण्यासाठी बाई झालेल्या मुलांची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 01:29 PM2020-01-04T13:29:01+5:302020-01-04T13:29:53+5:30
स्त्री, पुरुष आणि त्यांचे समाजाने ठरवलेले पेहराव याच्या पलीकडे जात माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जावं याच विचाराने त्यांनी चक्क साडी नेसून कॉलेजमध्ये प्रवेश केला आणि....
पुणे :कॉलेजमध्ये डे'ज साजरे करतानाची मजा आजही प्रत्येकाला आठवत असते. पण पुण्यामधील फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मात्र अभिनव प्रकारे साडी डे साजरा केला. स्त्री, पुरुष आणि त्यांचे समाजाने ठरवलेले पेहराव याच्या पलीकडे जात माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जावं याच विचाराने त्यांनी चक्क साडी नेसून कॉलेजमध्ये प्रवेश केला.
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या की कॉलेज विश्वात डे साजरे करण्याची धूम असते. साडी डे, मिक्स मॅचिंग डे, चॉकलेट डे असे विविध दिवस साजरे केले जातात. फर्ग्युसनमध्ये तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या श्रद्धा देशपांडे, सुमित होनवडजकर, आकाश पवार आणि हृषीकेश सानप यांनी मात्र आयडियाची कल्पना लढवत वेगळा वेशभूषा केली. श्रद्धाच्या मदतीने या तिघांनी साड्या नेसल्या तर श्रद्धाने मात्र टाय आणि शर्ट असा पेहराव केला. अर्थात कॉलेजमध्ये प्रवेश केल्यावर अनेकजण त्यांच्याकडे आश्चर्याने बघत होते. काहींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढले तर काहींनी यामागचा अर्थही जाणून घेतला.
याबाबत माहिती सांगताना सुमित म्हणाला की, 'मुलींनी हेच कपडे घालायचे आणि मुलांनी तेच कपडे घालायचे ही बंधने चुकीची आहेत. आपण स्त्री पुरुष समानता म्हणतो मग प्रत्यक्ष अमलात का आणत नाही?, हाच सगळा विचार करून आम्ही अशी वेशभूषा केली. यावर सगळ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया येतील असं वाटलं नव्हतंया झालंही तसंच. अनेकांनी खिल्ली उडवली पण येऊन कौतुक करणारे त्यापेक्षा कितीतरी जास्त होते. विशेषतः अनेक मुलींनी कौतुक केलं हे विशेष वाटतं.या मुलांचे फोटो सध्या कॉलेज ग्रुपवर व्हायरल झाले असून इतर कॉलेजमध्येही असा ट्रेंड आला तर आश्चर्य वाटायला नको.