Pune FC Road Drugs Case: पोलिसांच्या ताब्यातील २ तरुणांची ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 05:24 PM2024-06-25T17:24:14+5:302024-06-25T17:24:50+5:30
दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते, मात्र त्याअगोदरच दोघांनी ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली दिली
Pune FC Road Drugs Case: पुणे एफसी रोडवरील ड्रग्स प्रकरणात L3 बार मध्ये कथित ड्रग्सचे सेवन करणाऱ्या २ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एका तरुणाला पुणेपोलिसांनी तर दुसऱ्या तरुणाला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मुंबईतून ताब्यात घेतलं आहे. नितीन ठोंबरे आणि करण मिश्रा असे दोन तरुणांचे नाव आहेत. दोन्ही तरुणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. परंतु त्याअगोदरच दोघांनी ड्रग्सचे सेवन केल्याची कबुली दिली आहे. दोघेही २४-२५ वर्ष वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे दोन्ही तरुण एकमेकांचे मित्र असून रात्री १.३० वाजता या तरुणांनी L3 बार मध्ये एंट्री केली होती
एफसी रोडवरील एका पबच्या शौचालयात अंमली पदार्थांचे सेवन काही युवक करत असल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दरम्यान ड्रग्स पार्टी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून या संपूर्ण पार्टीचे विश्लेषण सुरू आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्हीचे डीव्हीआर पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. तर त्या हॉटेलच्या मॅनेजरसह ७ जणांना ताब्यात घेतले आहे. तर उत्पादन शुल्क विभागाकडून हॉटेल सील करण्यात आले असून हॉटेलमधील सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे.
पब मध्ये प्रवेश देण्यापूर्वी वयाची शहानिशा करण्यात यावी. अल्पवयीन मुलांना पबमध्ये प्रवेश देऊ नये, तसेच त्यांना मद्य विक्री करण्यात येऊ नये. रात्री दीड वाजेनंतर पब सुरू ठेऊ नयेत. नागरिकांना त्रास झाल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल, अशा सूनचा पब चालकांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही मात्र या आदेश आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे या व्हिडिओमध्ये असलेल्या वेळेवरून स्पष्ट होत आहे. त्यानंतर पोलीस आणि उत्पादनशुल्क विभागाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणानंतर पुणे शहरात कोट्यवधींचे ड्रग्स पकडण्यात आले होते. पोलिसांनी कडक कारवाई करत शहर पिंजून काढ्ले होते. त्यानंतर कल्याणीनगर अपघात प्रकरण घडले. त्यामध्ये अल्पवयीन मुलांना सर्रासपणे दारू, ड्रग्स देतानाचे व्हिडिओ समोर आले. त्यावरून पोलिसांनी पुन्हा पब, बार बाबत कडक नियमावली जाहीर केली. परंतु रविवारच्या ड्रग्स फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स प्रकरणाने पुन्हा प्रशासन थंड झाले आहे का? असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. त्यावरून आता पोलीस, महापालिका यांनी कडक कारवाईला सुरुवात केली आहे.