पुणे फेस्टिव्हल : २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान रंगणार सोहळा, संगीत, नृत्य व गायनाची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 04:02 AM2017-08-21T04:02:49+5:302017-08-21T04:02:49+5:30
गेल्या २९ वर्षांपासून पुण्याच्या संस्कृतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या येत्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते एक सप्टेंबरला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
पुणे : गेल्या २९ वर्षांपासून पुण्याच्या संस्कृतीमध्ये मोलाचा वाटा असणाऱ्या येत्या पुणे फेस्टिव्हलमध्ये संगीत, नृत्य, कला, गायन, वादन, क्रीडा आदी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. २५ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान गणेश कला, क्रीडा रंगमंच येथे रंगणार आहे. ज्येष्ठ अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते एक सप्टेंबरला महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने दिला जाणारा पुणे फेस्टिव्हल पुरस्कार यंदा अभिनेते शेखर सुमन, क्रिकेटपटू केदार जाधव, दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि आयटीतज्ज्ञ आनंद खांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे.
एक सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता फेस्टिव्हलचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महापौर मुक्ता टिळक, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावळ, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार व ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, अभिनेता विवेक ओबेरॉय, रति अग्निहोत्री, कार्तिक आर्यन, नेहा शर्मा आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक सुरेश कलमाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई आदी या वेळी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवात नृत्य, संगीत, नाट्य आणि क्रीडा स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये आॅल इंडिया उर्दू मुशायरा, उगवते तारे, इंद्रधनू, शास्त्रीय संगीत, नृत्य, सुगम संगीत, मराठी कविसंमेलन, हास्योत्सव, एकपात्री, महिला महोत्सव, पेंटिंग प्रदर्शन, मिस पुणे फेस्टिव्हल स्पर्धा, केरळ महोत्सव, मराठी नाटके अशा विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेण्यात येणार आहे. गणेश कला, क्रीडा रंगमंच, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि बालगंधर्व रंगमंदिर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय फेस्टिव्हलमध्ये गोल्फ, मल्लखांब, बॉक्सिंग, कुस्ती या खेळांच्या स्पर्धाही रंगणार आहेत. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
ऊर्मिला मातोंडकरची लावणी ठरणार आकर्षण
पुणे फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर लावणी सादर करणार आहे. ऊर्मिलासह पूजा सावंत, नेहा महाजन, तेजस्विनी लोणारी, वैशाली जाधव, वैष्णवी पाटील या अभिनेत्री लावणीवर थिरकणार आहेत. या वेळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे, राधा सागर आणि नकुल घाणेकर गणेशवंदना सादर करणार असून त्यानंतर भार्गवी चिरमुले, नंदेश उमप आणि अभ्यंग कुवळेकर यांच्या पोवाड्यांचे सादरीकरण रंगणार आहे.