पुण्यात झोपड्यांची राखरांगोळी; सुमारे ७५ झोपड्या खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:50 AM2018-04-22T06:50:39+5:302018-04-22T06:50:39+5:30
डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टी ही दाट लोकवस्तीची असून आत जाण्यास अरुंद रस्ते आहेत.
बिबवेवाडी : मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर झोपडपट्टीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे ७५ झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती कळताच अग्निशामक दलाचे १२ ते १५ आगीचे बंब व पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल होऊन आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. सुदैवाने यात कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. शनिवारी सकाळ दहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.
डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टी ही दाट लोकवस्तीची असून आत जाण्यास अरुंद रस्ते आहेत. शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. त्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोटही झाला. त्यामुळे आग पसरत गेली. दरम्यान, येथे अग्निशामक दलाला मदत कार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे अग्निशामक दलाच्या जवानांबरोबरच स्थानिक रहिवासी आजूबाजूच्या पक्क्या इमारतींवर चढून आगीच्या ठिकाणी पाण्याचा मारा करीत होते.
या दुर्घटनेत अनेकांच्या संसारोपयोगी वस्तूंची अक्षरक्ष: होळी झाली. ७५ कुटुंबे उघड्यावर आली आहेत. वस्तीतील अनेक महिला व लहान मुले स्वत:चे घर डोळ्यांसमोर जळताना पाहून जिवाच्या आकांताने रडत होती. आग लागल्याची माहिती कळताच वस्तीतील नागरिक भयभीत होऊन धावपळ करीत होते. अनेकांना त्यांच्या घरातील महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम, सोने आदी साहित्य घेता आले नाही. आग लागल्यामुळे मार्केटयार्ड परिसरांत धुराचे लोट दिसत होते. आग लागल्याची माहिती कळताच सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक प्रवीण चोरबेले, नगरसेवक सुनील कांबळे व नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेविका अनुसया चव्हाण यांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीची पाहणी केली.
प्रशासनाकडून राहण्याची सोय
प्रशासनाने पंचनामा करून आगीत झालेल्या नुकसानाचा व परिस्थितीचा आढाव घेतला. प्रशासनाने आग दुर्घटनाग्रस्त नागरिकांची राहण्याची कृषी
उत्पन्न बाजार समितीच्या आंबा महोत्सवाच्या मांडवात तात्पुरत्या स्वरूपाची सोय केली आहे.
कष्टाने घेतलेल्या वस्तूंचा कोळसा
डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टीत श्रमिक लोक राहतात. त्यामुळे त्यांनी मोठ्या कष्टाने तयार केलेल्या घरात अनेक छोट्यामोठ्या गृहोपयोगी वस्तू होत्या. या वस्तूंचा या आगीमुळे अक्षरश: कोळसा झाला.
अग्निशमन कर्मचाऱ्याला श्वसनाचा त्रास
आग लागल्यामुळे घरातील वस्तू जळाल्यामुळे धुरांचे लोट उठत होते. आग्निशामक दलाचे जवान रौफ अब्दुला शेख यांना छपरामुळे श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांना उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुलीच्या लग्नाचा बस्ता जळाला
शेख अब्दुल रहीम यांच्या घरात त्यांच्या मुलीचे १३ मे रोजी लग्न होते. त्यामुळे त्यांनी घरात काही रोख रक्कम व दागिने ठेवले
होते. यातील नोटा अर्धवट जळाल्या असून आगीमुळे सोने वितळून गेले. मुलीच्या बस्त्याचे कपडेही जळाले. त्यामुळे या कुटुंबासमोर आता लग्न कसे लावून द्यायचे, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.
पाहिला मी संसार जळताना...
बिबवेवाडी : मार्केटयार्ड येथील डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टीला सकाळी साडेदहाच्या सुमारास एका घरात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. हीच आग क्षणार्धात आजूबाजूच्या घरांमध्ये पसरल्यामुळे वस्तीतील नागरिक जिवाच्या भीतीने इकडेतिकडे पळत सुटले. वस्तीतील लोकांनी डोळ्यांदेखत अनेक वर्षांपासून कष्टाने जमा केलेल्या घरातील सामानाची क्षणार्धात राखरागोंळी होताना पाहिली.
आग लागण्याची दुर्घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली, त्या वेळी वस्तीतील बरेचसे नागरिक कामांवर गेलेले होते. त्यामुळे जीवितहानी टळली. आग आटोक्यात आणल्यानंतर वस्तीतील नागरिक, आगीत भक्ष्यस्थानी पडलेल्या घरांच्या राखेत आपला संसार शोधत होते.
सकाळी आग लागल्यानंतर दुपारपर्यंत परिसरात भीतीचे वातावरण होते. जळणारे घर पाहून अनेक जण हताश होऊन बसले होते. प्रत्येक जण एकमेकाला सावरत होता. अनेकांची लहान मुले सकाळपासून उपाशीपोटी होती. त्यांना सायंकाळी वडापाव देण्यात आले.
महत्त्वाची कागदपत्रे जळाली
आगीमध्ये अनेक कुटुंबांची रेशनकार्ड, आधार कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. त्यामुळे ‘आमचे भवितव्य अंधारमय झाले आहे,’ अशी भावना इर्शाद शेख या बीकॉमच्या दुसºया वर्षात शिकणाºया विद्यार्थ्यांने व्यक्त केली.