शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे ५ दुकानं जळून खाक; पहिला मजला भस्मसात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 10:50 PM2021-03-26T22:50:25+5:302021-03-26T23:29:48+5:30
खराडी बायपास रसत्यावरील राघोबा पाटील नगर येथे घडली घटना
पुणे : खराडी बायपास रस्त्यावरील राघोबा पाटील नगर येथील राघोबा पाटील चौकातील एका इमारतीला आग लागल्याने पाच दुकाने आणि पहिला मजला जाळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी (२६ मार्च) रात्री साडे आठ वाजता घडली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग एका गादीच्या दुकानाला लागली. त्यामुळे आगीने पेट घेतला. आगीच्या मोठ्या झळा मोठ्या प्रमाणात निघू लागल्या. यात पाच दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील डायग्नॉस्टिक लॅब जळून खाक झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
आग मोठी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. इमारत रस्त्याला लागून असल्याने वाहतूक कोंडी झाली होती. माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, किरण आवटे, पोलीस कर्मचारी राहुल सोनकांबळे, राजाभाऊ तांबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ अग्निशमन दलाच्या चार मोठ्या गाड्या, एक देवदूत, घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी १५ ते २० मिनिटांचा वेळ लागला. इमारतीच्या समोरील गाड्या काढताना शुभम वाघमारे यांचा हात भाजला. सागर गिरमे, मनोज माने, सतीश वाघमारे, अजर सय्यद. सौरभ जाधव, सिद्धार्थ रणीत यांनी गर्दी कमी करण्यासाठी मदत केली.