पुणे गणेशोत्सव : गणेशमूर्ती घरी विसर्जित करण्याऐवजी दान करणे हाच सर्वाेत्तम पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 02:56 PM2020-08-22T14:56:21+5:302020-08-22T15:19:11+5:30
पुणे शहरात दरवर्षी साधारणत: पाच लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते.
पुणे : महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची गणेशमूर्ती ‘अमोनियम बायकार्बोनेट’ या रसायनाचा वापर करून घरच्या घरी विसर्जित केली तरी, मूर्ती पाण्यात पुर्णपणे विरघळण्यास दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. त्यामुळे घरी मूर्ती विसर्जित करण्याऐवजी ती पूजा करून पाण्यात बुडवून बाजूला ठेवावी, व नंतर एकाने ही मूर्ती पालिकेने उभारलेल्या मूर्तीदान केंद्रावर नेऊन द्यावी हाच सर्वात्तम पर्याय असल्याचे पर्यावरण तज्ज्ञांचे मत आहे.
पुणे शहरात दरवर्षी साधारणत: पाच लाख घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होते.यातील बहुतांशी गणेश मुर्ती या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूूमीवर गर्दी टाळावी याकरिता घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन घरीच करावे असे महापालिकेने सुचित केले आहे. त्यानुसार महापालिकेकडून ‘अमोनियम बायकार्बोनेट’ चा पुरवठाही करण्यात येणार आहे. परंतु,‘अमोनियम बायकार्बोनेट’ या रसायनाचा वापर करून मुर्ती पाण्यात विसर्जित केली तरी, महापालिकेच्या म्हणण्यानुसार मूर्ती विरघळण्यास ४८ तास कालावधी लागणार आहे.तसेच सदर मूर्तीवर जर प्लॅस्टिक पेंट असेल तर तो कालावधी अधिक राहणार आहे. तर जे द्रावण तयार होईल ते दोन दिवस बाजूला ठेवल्याशिवाय त्यातील कॅल्शियम कार्बोनेटचा थर पाण्यापासून वेगळा होणार नाही.
या सर्व गोष्टींचा विचार करता, मूर्तीची यथोचित पूजा करून, विसर्जनाच्या दिवशी केवळ एकदा पाण्यातून बुडवून बाहेर काढावी व बाजूला ठेऊन द्यावी. या सर्व मुर्तींचे संकलन करण्यासाठी पुणे महापालिकेने प्रत्येक वार्डात दोन मुर्तीदान केंद्रांची उभारणी केली असून, या ठिकाणी घरात विसर्जित केलेली मूर्ती एका व्यक्तीने आणून द्यावी़ असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी केले आहे.
--------------
घरात मूर्ती विसर्जित करूच नका
प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घरात विसर्जित करण्याऐवजी ती दान करावी हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मत, पर्यावरण अभियंता आणि मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले.
‘अमोनियम बायकार्बोनेट’ वापर करून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती घरात बादलीत विसर्जित केली तरी, मुर्तीवरील रंगामुळे ती विरघळण्यास आठ ते दहा दिवस लागतात. तसेच या प्रक्रियेदरम्यान अमोनियम वायूची निर्मिती होत असते. तसेच हे एकत्रित झालेले द्रावण मोकळ्या जागेत टाकल्याने तेथील मातीचा सछिद्रपणा नाहीसा होतो.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मुर्ती विरघळण्यास सात आठ दिवस लागत असल्याने लहान मुलांपासून ती बादली दूर ठेवणे जरूरी बनते. त्यामुळे मूर्ती दान करणे हाच पर्यावरणपूरक पर्याय सर्वोत्तम असल्याचे सराफ यांनी सांगितले.
----------------------------
महापालिकेने उपलब्ध करून दिले केवळ ३० फिरते हौद
घरच्या गणपतीचे घरीच विसर्जन करा असे सूचित करणाऱ्या पुणे महापालिकेने, शहरात केवळ तीस फिरते हौद उपलब्ध करून दिले आहेत. फिरते हौद हा सर्वात शेवटचा पर्याय असून, इतर पर्याय शक्य नसल्यासच फिरत्या हौदाचा पर्याय निवडावा असे महापालिकेने सांगितले आहे.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयात दोन असे ३० फिरते हौद शहरात कार्यरत राहणार आहेत. हे फिरते हौद कधी कुठल्या वेळेत व कुठे फिरणार याचा तपशील क्षेत्रिय कार्यालयनिहाय कळविण्यात येणार आहे़ हा अंतिम पर्याय म्हणूनच नागरिकांनी पहावे़ असे सांगतानाच महापालिकेने प्रत्येक वार्डात उभारण्यात येणाऱ्या मूर्तीदान केंद्रांची यादीही जाहीर केली आहे. या केंद्रांच्या ठिकाणच्या याद्या सर्व नगरसेवकांसह स्थानिक व्हॉटस् अप ग्रुप वर पाठविण्यात आल्या आहेत. तसेच याची फिरत्या हौदांच्या वेळांची माहितीही त्यांना दिली जाणार असून, हे हौद प्रवास करीत असताना लॉऊड स्पिकरवरून पुढील वेळ व ठिकाण याचा तपशील देणार आहेत.