Pune Ganpati: फिरते विसर्जन फक्त फिरले...! ना मार्गाचा नकाशा, ना स्पीकर; प्रशासन अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 12:22 PM2023-09-24T12:22:05+5:302023-09-24T12:22:43+5:30
नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची मागणी नसतानाही महापालिकेने गणपती विसर्जनासाठी सलग तिसऱ्या वर्षी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले हाेते
पुणे : महापालिकेने तब्बल १.४२ कोटी रुपये खर्च करून उपलब्ध करून दिलेल्या १५० फिरत्या विसर्जन हौदांची यंत्रणा नागरिकांपर्यंत पोहोचण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. या फिरत्या विसर्जन पदावर स्पीकरची यंत्रणा नव्हती. या हौदांच्या मार्गाचा नकाशा उपलब्ध नव्हता. त्यामुळे फिरते विसर्जन फक्त फिरले, अशी स्थिती शनिवारी पाहायला मिळाली.
काेरोनासारखी साथरोगाची परिस्थिती नसताना, नागरिकांकडून कोणत्याही प्रकारची मागणी नसतानाही महापालिकेने गणपती विसर्जनासाठी सलग तिसऱ्या वर्षी फिरत्या हौदांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे ठरवले हाेते. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या हाेत्या. या दोन्ही निविदा स्वयंभू ट्रान्स्पोर्ट या ठेकेदारास मिळाल्या आहेत. यामध्ये प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयास १० हाैद देण्यात आले. त्यामध्ये महापालिकेच्या नावाचा फलक, लोखंडी टाकी, कामगार यांचा समावेश आहे, पण नागरिकांना याची माहिती मिळावी, अशी कोणतीही व्यवस्था महापालिकेने केलेली नाही.
ना मार्ग, ना घोषणा
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १० गाड्या दिल्या आहेत; पण कोणता फिरता हौद कोणत्या भागात असणार, याची माहिती महापालिकेने संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत फ्लेक्स किंवा इतर माध्यमातून दिलेली नाही. या फिरत्या हौदांवर स्पीकरची व्यवस्था नसल्याने कर्मचारी ‘फिरता विसर्जन हौद आला आहे’ अशी घोषणाही करू शकत नाही. शनिवारी शहरात हे विसर्जन हौद घेऊन वाहन फिरत असले तरी नागरिकांना त्यांच्याबद्दल माहिती नव्हती. या निविदेत स्पीकर व माईकची व्यवस्था करावी, अशी अट निविदेत टाकलेली नसल्याचेही समोर आले आहे.