Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:34 PM2024-09-19T12:34:46+5:302024-09-19T12:35:02+5:30

२०२२ मध्ये विसर्जन मिरवणूक ३० तास तर २०२३ ला ३१ तास चालली होती, यंदाही विसर्जन मिरवणुकीने ३० तासांचा आकडा कायम ठेवला

Pune Ganpati: This year immersion ceremony in Pune lasted 30 hours and 12 minutes; As many as 452 circles participated in the procession | Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग

Pune Ganpati: यंदा पुण्यातील विसर्जन सोहळा रंगला ३० तास १२ मिनिटे; तब्बल ४५२ मंडळांचा मिरवणुकीत सहभाग

पुणे: आकर्षक रोषणाईने सजलेले भव्य रथ, ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या जयघोषात मंगळवारी पुणेकरांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला. पुण्याची वैभवशाली परंपरा असलेला हा मंगलमय सोहळा पाहण्यासाठी देशविदेशासह लाखोंच्या संख्येने गणेशभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुका यंदा मोठ्या थाटात निघाल्या. विसर्जन सोहळा यंदा ३० तास १२ मिनिटे रंगला. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, अशा एकूण ४५२ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. मंडळांची संख्या काहीशी कमी असतानाही बाप्पाला निरोप देण्यासाठी यंदा ३० तासांच्या पुढे मिरवणुका चालल्या.

मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, अखिल मंडई मंडल या मंडळाच्या ‘श्रीं’च्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि सनई चौघड्यांच्या निनादात ‘मोरया...मोरया’चा जल्लोष करीत हा विसर्जन सोहळा पार पडला. २०२२ मध्ये विसर्जन मिरवणूक ३० तास तर २०२३ ला ३१ तास चालली होती. यंदाही विसर्जन मिरवणुकीने ३० तासांचा आकडा कायम ठेवला. विशेष म्हणजे, यंदा अनंत चतुर्दशीला वरुणराजाने विश्रांती घेतल्याने भाविकांचा उत्साह अधिकच दुणावला.

लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, अशा एकूण ४५२ मंडळांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. गेल्यावर्षी या प्रमुख चार रस्त्यांवरील मिरवणुकीत ६२४ मंडळे सहभागी झाली होती. यंदा मंडळांची संख्या घटल्याचे पाहायला मिळाले. खडकी, लष्कर, येरवडा, कर्वे रस्ता, दत्तवाडी व शहराच्या इतर भागांतील विसर्जन मिरवणुकादेखील शांततेत पार पडल्या. त्यामध्ये ३,७६३ सार्वजनिक आणि १०,१४,६३७ घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. मानाचे पाच गणपती मिरवणुकीत सहभागी झाल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा गणपती सायंकाळी चार वाजताच बेलबाग चौकात आला होता. त्यामुळे मिरवणूक लवकर संपेल असे वाटत असतानाही गतवर्षीप्रमाणेच मिरवणूक यंदाही रेंगाळली. ‘निर्बंधमुक्त उत्सव’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनीच केल्याने पोलिसांनीदेखील काहीशी बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र दिसून आले.

दरवर्षी पुण्याची गणेशोत्सव मिरवणूक ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून भाविकांची गर्दी होते. यंदाही ही गर्दी काहीशी कायम होती. मंगळवारी (दि. १७) सकाळी १०:१५ वाजता मंडईमधील टिळक पुतळ्याजवळ मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती होऊन मिरवणुकीला सुरुवात झाली. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा ७ वाजून ३८ मिनिटांनी पाताळेश्वर घाटावर विसर्जित झाला. मिरवणुकीत कासेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळाचा शेवटचा गणपती ४ वाजून ४२ मिनिटांनी नटराज घाट येथे विसर्जित झाला. मंगळवारी (दि. १७) सुरू झालेली विसर्जन मिरवणूक बुधवारी (दि. १८) सायंकाळी जवळपास पावणेपाच वाजेपर्यंत सुरू होती. पुण्याचा विसर्जन मिरवणूक सोहळा तब्बल ३० तास १२ मिनिटे चालला. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत विसर्जन मिरवणूक २८ तास चालली असल्याचा दावा केला. मात्र, यंदाही मिरवणुकीने ३० तासाचा आकडा ओलांडला. सर्वोच्च न्यायालयाने एनजीटीच्या ढोल-ताशा झांज पथकातील सदस्यांची ३० संख्या मर्यादित करण्याच्या आदेशाला स्थगिती दिली होती. त्यामुळे मानाच्या गणपतींसह इतर गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशा पथकांसह वादकांची अधिक असलेली संख्या, बेलबाग चौक ते टिळक चौकपर्यंत घुसलेली जवळपास १६ मंडळे, पोलिसांची बघ्याची भूमिका, अशा काही कारणास्तव मिरवणूक लांबली असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मानाच्या गणपतींचे फोटो, ढोल-ताशांचं वादन, असा वैभवशाली मिरवणुकीचा सोहळा मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रत्येकाची चढाओढ लागली होती. प्रत्येकाच्या हाती मोबाइल असल्यामुळे सर्व जण व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकत होते.

मिरवणुकीत सहभागी मंडळे

लक्ष्मी रास्ता             १३१
टिळक रस्ता            १७०
कुमठेकर रस्ता ५४
केळकर रस्ता ९७
एकूण             ४५२

मानाचे गणपती             विसर्जनाची वेळ
कसबा गणपती                         ४:३५
तांबडी जोगेश्वरी                         ५:१०
गुरुजी तालीम मंडळ             ६:४५
तुळशीबाग गणपती             ७:१४
केसरीवाडा ७:३८

मानाच्या गणपतींचे पावणेनऊ तासांत विसर्जन

(गतवर्षीच्या तुलनेत केवळ १५ मिनिटे आधी)

ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन होण्यास पावणेनऊ तासांचा कालावधी लागला. गतवर्षी ९ तास म्हणजे त्या तुलनेत यंदा केवळ १५ मिनिटे आधी गणपतींचे विसर्जन झाले. मंगळवारी (दि. १७) १०:१५ वाजता मिरवणुकीस सुरुवात झाली आणि ७ वाजून ३८ मिनिटांनी मानाच्या पाचव्या गणपतीचे पांचालेश्वर घाट येथे विसर्जन झाले.

पोलिसांनी मोजली अलका चौकातील वेळ

गणपतींचे विसर्जन ज्या घाटांवर होते ती विसर्जनाची अचूक वेळ धरली जाते. मात्र पोलिसांनी अलका चौक येथे ३ वाजता विसर्जन मिरवणूक समाप्त झाली. त्यानुसार मिरवणूक २८ तास ४५ मिनिटे चालली असे अधिकृतपणे जाहीर केले. मात्र अग्निशमन दलाच्या नोंदीनुसार मिरवणुकीतला कासेवाडी येथील महाराष्ट्र तरुण मंडळाचा शेवटचा गणपती ४ वाजून ४२ मिनिटांनी नटराज घाट येथे विसर्जित झाला. त्याप्रमाणे मिरवणुकीस ३० तास १२ मिनिटे इतका कालावधी लागला असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Pune Ganpati: This year immersion ceremony in Pune lasted 30 hours and 12 minutes; As many as 452 circles participated in the procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.