पुण्यातील मुली 'गो विथ ट्रेंड'च्या प्रेमात; पंजाबी ड्रेस कपाटात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 12:04 PM2022-12-24T12:04:10+5:302022-12-24T12:05:11+5:30
ट्रेंडनुसार स्वतःला अपडेटस् ठेवण्यात मुली नेहमीच प्राधान्य देत असल्याचे दिसते...
- किमया बोराळकर
पुणे : परकर पोलका झाला इतिहासजमा, पंजाबी ड्रेस गेला कपाटात, पुण्यातल्या मुली आता गो विथ ट्रेंडच्या प्रेमात आहेत. एकेकाळी पुणेरी थाटात सायकलवर जाणाऱ्या मुलीही अवाक् होऊन पाहणाऱ्या पुणेकरांना आता त्याच पुणेरी टेचात दुचाकी चालवणाऱ्या मुली, त्यासुद्धा अशा पाश्चात्य पोशाखात दिसत आहेत.
महाविद्यालयीनच नाही, तर शालेय मुलीसुद्धा आता बाहेर जातानाचा पोशाख म्हणून जीन्स, ट्राउझर वापरत आहेत. त्यांच्याकडून जीन्स टॉप, टी-शर्ट, कुर्तीज, प्लाझो, क्रॉप टॉप अशा प्रकारांना पसंती मिळत आहे. ट्रेंडनुसार स्वतःला अपडेटस् ठेवण्यात मुली नेहमीच प्राधान्य देत असल्याचे दिसते.
चित्रपटांमधील ड्रेस फॉलो
मुलींकडून चित्रपटांमधील ड्रेस फॉलो होताना दिसतो. त्याशिवाय फॅशन आणि स्टाइल वाढवण्यासाठी तरुणाई वेगवेगळ्या युक्त्या अवलंबत आहे, असे दुकानदार सांगतात. साडी आता फक्त ट्रेडिशनल डे साठी म्हणून वापरली जाते. फार झाले तर लग्नसमारंभात. मात्र, तिथेही आता भारीतील घागरा-चोळी वगैरे परप्रांतीय पोशाखांनाच जास्त मागणी आहे, असेही दुकानदारांचे म्हणणे आहे.
कम्फर्ट महत्त्वाचे..
रोजच्या कपड्यांमध्ये मुलींना सगळ्यात महत्त्वाचे वाटते ते कम्फर्ट. म्हणजेच आरामदायी, मोकळे वाटणे. कोणत्याही कामात पोशाख अडचणीचा ठरायला नको, अशी त्यांची अपेक्षा असते. साडी किंवा ओढणीवाला पंजाही ड्रेस घालून गाडी चालवणे शक्य नाही. त्यामुळेच जीन्स, ट्राउझर्स, कुडता, टी-शर्टस्ना पसंती दिली जाते. त्यातही मग सध्याची फॅशन काय, स्टायलिश काय दिसते याचा विचार केला जातो, असे दुकानदार सांगतात.
पहिली पसंती जीन्स पँट, टी-शर्टलाच
घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा हौशेने मुली पैठणी घालून मिरवतात; पण डेली लाइफमध्ये मुली आजकाल वेस्टर्न ड्रेसेसला पसंती असते. किमतीला स्वस्त, घालण्यास सोयीस्कर, दिसायला आकर्षक अशा विविध कारणांमुळे मुलींची पहिली पसंती जीन्स पँट व टी-शर्टलाच असल्याचे दिसते.
नव्या स्टाइलच्या काही ड्रेसची नावे :
वेस्टर्न वन पीस, हिवाळ्यात ऊब देणारे लाँग श्रग, ट्राउझर्स, डेनिम जॅकेटस्, हुडीज, वेस्टर्न कुर्तीज, बेलबॉटम.
आजच्या धकाधकीच्या जीवनात इंडियन टेरॅडिशनल ड्रेस घालण्यासाठी वेळ मिळत नाही. त्याला वेळही फार लागतो. टी-शर्ट जीन्स घालून कमी वेळात लगेच तयार होता येते. घालण्यास कम्फर्टेबल. कमी वेळात क्लासिक लूक मिळू शकतो. साडीपेक्षा कॅरी करण्यासाठी अगदी सोयीस्कर असते.
- पूजा सपकार, विद्यार्थी
भारतीय पारंपरिक पोशाखांना निटनेटके ठेवण्यास जास्त खर्च येतो. पाश्चात्य कपड्यांना तुलनेत निगा राखण्यास फार खर्च येत नाही. शेवटी सर्वांबरोबर राहायचे तर ट्रेंड काय आहे, तेही पाहावे लागते.
- संस्कृती भालेराव, आयटी कर्मचारी