जगातील पहिल्या ४० शहरांत पुणे, जागतिक आव्हान स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 05:31 AM2018-03-25T05:31:20+5:302018-03-25T05:31:20+5:30
वन प्लॅनेट सिटी चॅलेंजच्या (ओपीसीसी) सन २०१७-१८ या वर्षातील जागतिक आव्हान स्पर्धेत जगातील २३ देशांमधील ११८ शहरे सहभागी झाली होती. त्यातील पहिल्या ४० मध्ये पुणे शहराचा समावेश झाला आहे. पुण्यासह पणजी व राजकोट ही देशातील अन्य दोन शहरेही पहिल्या ४० मध्ये आहेत.
पुणे : वन प्लॅनेट सिटी चॅलेंजच्या (ओपीसीसी) सन २०१७-१८ या वर्षातील जागतिक आव्हान स्पर्धेत जगातील २३ देशांमधील ११८ शहरे सहभागी झाली होती. त्यातील पहिल्या ४० मध्ये पुणे शहराचा समावेश झाला आहे. पुण्यासह पणजी व राजकोट ही देशातील अन्य दोन शहरेही पहिल्या ४० मध्ये आहेत.
ऊर्जा, वाहतूक, गृहनिर्माण व कचरा व्यवस्थापन या चार महत्त्वाच्या विषयांवर केलेले उल्लेखनीय काम, राबवलेले उपक्रम, योजना या निकषांवर हा समावेश केला जात असतो. त्यासाठी आंतरराष्ट्रीय परीक्षक नियुक्त केले जातात.
त्यांच्या कठोर परीक्षणानंतरच ही निवड होत असते. पहिल्या ४० शहरांमध्ये निवड झाल्यामुळे पुण्यासह पणजी व राजकोट ही तीन शहरे आता जागतिक स्तरावरील या स्पर्धेत पुढच्या टप्प्यात पोहोचली आहेत.
निवड झालेली तीनही शहरे देशातील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या १०० शहरांपैकी आहेत. तिथे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत.
पुणे शहर महापालिका तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम शहरात राबवत असून त्यामुळे शहराचे जुने चित्र बदलत चालले आहे.
या स्पर्धेच्या संयोजक संस्थेच्या वतीने जगभरात अनेक ठिकाणी जैवविविधता, नैसर्गिक अधिवास व पर्यावरणसंवर्धनासाठी काम करते.