Pune: तापमानातील तीव्र चढ-उताराने आजारी पडलंय पुणे! कुठे १२, तर कुठे २० अंश तापमान
By श्रीकिशन काळे | Published: December 14, 2023 05:34 PM2023-12-14T17:34:44+5:302023-12-14T17:35:06+5:30
शहरातील एका भागात १२ अंश सेल्सिअस तर दुसऱ्या भागात २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद पाहायला मिळत आहे....
पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात बऱ्यापैकी थंडी पडत असून, त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. सर्दी, खोकला, गळा खवखवणे आदी गोष्टींमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हवेत गारठा असल्याने किमान तापमानात चढ-उतार होत आहे. शहरातील एका भागात १२ अंश सेल्सिअस तर दुसऱ्या भागात २० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद पाहायला मिळत आहे.
राज्यामध्ये किमान तापमानात घट झाली असल्याने सर्वत्र थंडीची चाहूल लागलेली आहे. विदर्भामध्ये गारठा जाणवत आहे, तरी देखील किमान तापमानात वाढ आहे. सातत्याने किमान तापमानातील चढ-उतारामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. आग्नेय अरबी समुद्रात समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. राज्याच्या काही भागात मात्र उन्हाचा चटका आहे. काही ठिकाणी किमान तापमानातील वाढ-घट कायम आहे.
पुणे शहर व परिसरातील किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. पाषाण या भागामध्ये गुरुवारी (दि.१४) १२.१ किमान तापमान नोंदवले गेले, तर वडगावशेरीमध्ये २०.६ किमान तापमान होते. म्हणजे जवळपास ८ अंश सेल्सिअस तापमानाचा फरक पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी पुण्यात एकच तापमान सर्वत्र असायचे. परंतु, आता मात्र प्रत्येक भागात स्थानिक परिस्थितीमुळे किमान तापमानात फरक दिसून येत आहे.
पाषाण थंड, वडगावशेरी उष्ण !
पाषाण परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणावर झाडी आहे. तसेच वेताळ टेकडीचा परिसर आहे. परिणामी तिथे थंडी अधिक जाणवत आहे. दुसरीकडे वडगाव शेरीत गेल्या काही वर्षांमध्ये प्रचंड बांधकामे झाली आहेत. तेथील लोकसंख्या वाढली आहे. वाहनांची संख्या मोठी आहे. म्हणून तेथील किमान तापमान २० अंश सेल्सिअस नोंदवले जात आहे. हा बदल स्थानिक वातावरणाचा असल्याची माहिती हवामान खात्याने दिली.
शहरातील किमान तापमान (अंश सेल्सियस)
पाषाण : १२.१
एनडीए : १३.९
शिवाजीनगर : १४.०
हवेली : १४.४
लवासा : १५.९
लोणावळा : १८.०
कोरेगाव पार्क : १८.३
मगरपट्टा : १९.४
वडगावशेरी : २०.६