राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतदार पुण्यात; ८८ लाख नागरिक ठरवणार ३०३ उमेदवारांचे भविष्य
By नितीन चौधरी | Published: November 19, 2024 07:38 PM2024-11-19T19:38:32+5:302024-11-19T19:39:38+5:30
बारामती, इंदापूर, चिंचवड, हडपसर, कसबा, कोथरूड, खडकवासला विधानसभेत लक्षवेधी लढत
पुणे : राज्यात भौगोलिकदृष्ट्या दुसऱ्या क्रमांकाचे असलेल्या पुणे जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक मतदार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली. त्यांना मतदान करताना काेणतीही बाधा येऊ नये याचा विचार करून तब्बल ८ हजार ४६२ मतदान केंद्रे उभारली आहेत. तसेच पोलिसांसह ७४ हजारांहून अधिक मतदान अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. शहरी भागात मतदान कमी होत असल्याने जिल्ह्यातील तब्बल १२७ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. लाेकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला तसे विधानसभेला हाेऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८८ लाख ४९ हजार मतदार आज २१ मतदारसंघांतील ३०३ उमेदवारांचे भविष्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद करणार आहेत.
नवमतदारांची संख्या १ लाख ७८ हजार
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठीची प्रक्रिया अर्थात आचारसंहिता लागू केल्यानंतर डाॅ. सुहास दिवसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ असून, येथील मतदारसंख्या (४ नोव्हेंबरपर्यंत) ८८ लाख ४९ हजार ५९० आहे. त्यात ४५ लाख १९ हजार २१६ पुरुष, ४२ लाख ६९ हजार ५६९ महिला तर ८०५ तृतीयपंथी आहेत. एकूण मतदारांमध्ये दिव्यांग ८८ हजार ५३६; तर ५ हजार २६४ मतदार शंभरी पार केलेले आहेत. नवमतदारांमध्ये अर्थात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १ लाख ७८ हजार ६१५ इतकी आहे. तसेच २० ते २९ या वयोगटातील मतदार १५ लाख ६१ हजार ३५४ इतके आहेत. सेवा मतदारांची संख्या ५ हजार ६०० आहे, असेही जिल्हाधिकारी डाॅ. दिवसे यांनी सांगितले.
सर्वाधिक मतदार चिंचवडमध्ये
जिल्ह्यात सर्वाधिक मतदार चिंचवड मतदारसंघात असून, ही संख्या ६ लाख ६३ हजार ६२२ इतकी आहे. सर्वांत कमी २ लाख ८३ हजार ६३५ मतदार कसबा पेठ मतदारसंघात आहेत. जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक मतदार चिंचवडसह हडपसर व भोसरी मतदारसंघात आहेत. हडपसर मतदारसंघात ६ लाख २५ हजार ६७५ तर भोसरी विधानसभा मतदारसंघात ६ लाख ८ हजार ४३५ मतदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीत एकूण मतदार ८७ लाख १९ हजार ९२० इतके होते. तर १५ ऑक्टोबर रोजी ही संख्या ८७ लाख ५७ हजार ४२६ इतकी आहे.
चार मतदान केंद्र संवेदनशील
जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील मतदान केंद्र नाही. पण, इंदापूर, भोर, मावळ व शिवाजीनगर या मतदारसंघात प्रत्येकी एक अशी एकूण चार मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. एकूण मतदारसंख्येच्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान किंवा एकाच उमेदवाराला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्यास असे मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे घोषित केले जाते. जिल्ह्यात अशी मतदान केंद्रे केवळ चार आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यातही शिवाजीनगर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर केवळ १० टक्के मतदान झाले होते. या ठिकाणी लष्करातील मतदारांची नोंद आहे. त्यांच्या स्थलांतराचे प्रमाण जास्त असल्याने या मतदान केंद्रावर कमी मतदान झाले. संवेदनशील मतदान केंद्रांवर सीआरपीएफच्या विशेष तुकड्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर तसेच स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न
केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंट व शिवाजीनगर या दोन शहरी मतदारसंघांमध्ये जिल्ह्याच्या सरासरी मतदानापेक्षा तसेच राज्याच्या सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान होत असल्याने या दोन मतदारसंघांवर विशेष नजर ठेवावी, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार या दोन्ही मतदारसंघांमधील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे, असेही डाॅ. दिवसे यांनी सांगितले. त्यानुसार दिव्यांग तसेच ८५ पेक्षा अधिक वयोमान असलेल्या मतदारांना मतदान केंद्रांवर मतदान करण्याची इच्छा असेल, अशांसाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था, गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रांची निर्मिती, महिला व ज्येष्ठांसाठी जनजागृती, असे उपक्रम राबविण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
मतदारांची समान विभागणी
पूर्वीच्या मतदान केंद्रांची तपासणी केल्यानंतर नव्याने २२२ मतदान केंद्रे तयार केली आहेत. तसेच मतदारांची संख्या वाढल्याने ६६७ मतदान केंद्रांवरील मतदार समान पद्धतीने विभागण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी प्रत्यक्ष मतदान करताना मतदारांना वेळ लागत होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी प्रत्यक्ष मतदान करताना मतदान केंद्रात एकाच वेळेस किमान चार ते पाच मतदार असतील. त्यामुळे मतदानाला कमी वेळ लागेल, अशी अपेक्षा डाॅ. दिवसे यांनी व्यक्त केली.
विधानसभा मतदारसंघ - मतदार
जुन्नर - ३,२५,७६४
आंबेगाव - ३,१४,२५२
खेड आळंदी - ३,७६,६२३
शिरूर - ४,६६,०४२
दौंड - ३,१९,३११
इंदापूर - ३,४१,४८५
बारामती - ३,८०,६०८
पुरंदर - ४,६४,०१७
भोर - ४,३०,२७८
मावळ - ३,८६,१७२
चिंचवड - ६,६३,६२२
पिंपरी - ३,९१,६०७
भोसरी - ६,०८,४२५
वडगावशेरी - ५,०३,५३९
शिवाजीनगर - २,९५,११७
कोथरूड - ४,४०,५५७
खडकवासला - ५,७६,५०५
पर्वती - ३,६०,९७४
हडपसर - ६,२५,६७५
पुणे कॅन्टोन्मेंट - २,९५,३८२
कसबा पेठ - २,८३,६३५
एकूण - ८८,४९,५९०