Pune Heavy Rain: पुण्यात हाहाकार! घरांमध्ये पाणी; जनावरे दगावली, जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला
By श्रीकिशन काळे | Published: July 25, 2024 05:33 PM2024-07-25T17:33:53+5:302024-07-25T17:34:59+5:30
ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसला तरी, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, नदी, ओढे, नाले भरून वाहू लागले
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. पण बुधवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत केले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये कमरेइतके पाणी साठले. त्यात अडकलेल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. बुधवारी रात्रीपासून शहरात ११४ मिमी पावसाची नोंद झाली. हा जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला. तर ‘आयएमडी’च्या नोंदीमधील हा उच्चांकी दहावा पाऊस झाला आहे. वारजे येथील एका गोठ्यातील १४ जनावरे या पावसात दगावल्याची दुदैवी घटनाही घडली.
यंदा भारतीय हवामान विभागानूसार जून व जुलै महिन्यात पावसाचा खंड असल्याचे सांगण्यात आले होते. जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली, त्यानंतर जुलैच्या मध्यानंतर मात्र चांगलाच बरसू लागला. गेल्या दोन दिवसांपासून तर पुणे शहर व घाटमाथ्यावर संततधार ते जोरदार पाऊस होत आहे. गेल्या आठवड्यात धरणसाठाही कमीच होता. पण दोन दिवसांतील पावसाने धरणेही भरून गेली. ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसला तरी, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, नदी, ओढे, नाले भरून वाहू लागले. खडकवासला धरणातूनही विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रसिध्द असणारा भिडे पूलही पाण्याखाली गेला.
जून महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस
यंदा एका दिवसात शंभर मिमीहून अधिक पावसाची नोंद दोन दिवसांमध्ये झाली आहे. ९ जून २०२४ रोजी तब्बल ११७ मिमी पाऊस पडला, तर गुरूवारी सकाळपर्यंत ११४ मिमी पावसाची नोंद झाली. यापूर्वी भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदीनूसार गुरूवारचा पाऊस हा आतापर्यंतचा दहावा उच्चांकी ठरला आहे. हवामान विभागाकडे १८८९ पासूनच्या नोंदी आहेत.