सलग सुट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी, 3 किलोमीटर पर्यंत लांब रांगेमुळे वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 07:47 PM2017-12-23T19:47:12+5:302017-12-23T19:49:22+5:30
साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
हनुमंत देवकर/चाकण : साप्ताहिक सुट्टयांना जोडून आलेली नाताळची सुट्टी अशा सलग तीन दिवस सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक बाहेर पडल्याने आज पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तीन-चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहतुकीत अडकून पडल्याने वाहन चालकांसह प्रवासी त्रस्त झाले होते. कधी एकदाचा उड्डाण पूल होतोय? असे वैतागून बोलले जात होते.
सोमवारच्या नाताळाला जोडून शनिवार रविवारच्या लागोपाठ तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे कामगार वर्गाने गावाकडे जाणे व पर्यटनाला जाण्यासाठी घराबाहेर पडले. पुणे-नाशिक महामार्गावरून ओझर, लेण्याद्री, भीमाशंकर, शिवनेरी, शिर्डी, नासिक कडे जाणाऱ्या तसेच नासिक बाजूकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची महामार्गावर अचानक संख्या वाढल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. वाहतूक संथ गतीने जात असल्याने प्रवासी वैतागले होते. आंबेठाण चौक ते तळेगाव चौकापर्यंत अक्षरश: सर्व्हिस रस्त्यावरही रांगा लागल्या होत्या. रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व बसेस प्रवाशांनी जनावरांसारख्या कोंबून भरल्या होत्या.
महामार्गावरील राजगुरूनगर, चांडोली टोलनाका, चाकण मधील आंबेठाण चौक, तळेगाव चौक, आळंदी फाटा, एम आय डी सी चौक, कुरुळी फाटा, मोई फाटा, चिंबळी फाटा सह मोशी टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सातत्याने पुणे-नासिक महामार्ग रुंदीकरणाचे काम त्वरित सुरु करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलीस कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.